ऑस्ट्रेलियामध्ये सध्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या विश्वचषकात उद्या(५ मार्च) उपांत्य फेरीचे सामने होणार आहे. पहिला उपांत्य सामना भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघात भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरु होणार आहे. त्यानंतर दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे.
हे दोन्ही सामने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहेत. मात्र या दोन्ही सामन्यांवर पावसाचे सावट आहे. हे लक्षात घेता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स म्हणाले की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीसाठी आयसीसीला राखीव दिवस आयोजित करण्याची विनंती केली होती. पण आयसीसीने यासाठी नकार दिला.
त्यामुळे आता आयसीसीच्या नियमानुसार जर उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर किमान १०-१० षटकांचे सामने खेळवले जातील. पण जर तेही शक्य झाले नाही, तर मात्र साखळी फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल.
म्हणजेच उद्या भारत विरुद्ध इंग्लंड संघातील सामन्यात जर किमान १० षटकांचाही खेळ झाला नाही किंवा जर पावसामुळे सामना रद्द झाला तर आयसीसीच्या नियमानुसार भारत अंतिम सामन्यात जाईल. कारण भारताने साखळी फेरीनंतर अ गटाच्या गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला होता.
त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा दुसरा उपांत्य सामनाही जर पावसामुळे रद्द झाला तर ब गटात साखळी फेरीनंतर अव्वल क्रमांक मिळवणारा दक्षिण आफ्रिका संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–खेळपट्टीवर “रहाणे” कितपत योग्य?
–‘कॅप्टनकूल’ धोनी म्हणतो, चेन्नई सुपर किंग्सने शिकवल्या या गोष्टी
–उद्या होणाऱ्या भारत-इंग्लंड टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्याबद्दल सर्वकाही…