आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 ची सुरुवात 3 ऑक्टोबरपासून होणार आहे. युएईमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार असून 20 ऑक्टोबरला टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना होईल. तत्पूर्वी आयसीसीने महिला टी20 विश्वचषक 2024 साठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, यंदा या बक्षीस रक्कमेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.
याआधी या महत्त्वाच्या स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशला मिळणार होते, मात्र तेथील राजकीय अस्थिरतेनंतर झालेल्या विरोधामुळे, सुरक्षा लक्षात घेऊन ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीचे सामने आता शारजाह आणि दुबईच्या मैदानावर खेळवले जातील.
दरम्यान, आयसीसीने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आयसीसीने महिला क्रिकेटला पुरुष क्रिकेटच्या बरोबरीचे स्थान दिले आहे. आता आयसीसी स्पर्धांमध्ये पुरुष क्रिकेट संघाने जिंकलेली बक्षीस रक्कम महिला क्रिकेटसाठीही समान असेल. याची सुरुवात टी20 विश्वचषक 2024 पासून होणार आहे.
महिला टी20 विश्वचषकाची बक्षीस रक्कम
आयसीसीने 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या बक्षीस रकमेत मागील विश्वचषकाच्या तुलनेत वाढ केली आहे. आयसीसीने 2024 महिला टी20 विश्वचषक स्पर्धेची बक्षीस रक्कम 7,958,080 अमेरिकन डॉलर्स पर्यंत वाढवली आहे, जी 2023 च्या हंगामापेक्षा दुप्पट आहे. या लक्षणीय वाढीमुळे महिला टी20 विश्वचषक 2024 च्या विजेत्याला तब्बल 2.34 मिलियन डॉलर (सुमारे 20 कोटी रुपये) मिळतील. ही किंमत 2023 च्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या 1 मिलियन डॉलर (सुमारे 8 कोटी) रुपयांपेक्षा 134 टक्क्यांनी जास्त आहे.
महिला टी20 विश्वचषक 2024 च्या उपविजेत्या संघावरही भरपूर पैशांचा वर्षाव केला जाईल. उपविजेत्या संघाची बक्षीस रक्कमही गेल्या विश्वचषकाच्या तुलनेत 134 टक्क्यांनी वाढली आहे. उपविजेत्या संघाला यंंदा 1.17 मिलियन डॉलर बक्षिस रक्कम दिली जाईल. याशिवाय उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांना 675000 डॉलर बक्षिस मिळणार आहे. इतकेच नाही, तर साखळी फेरीत प्रत्येक विजयासाठी संघाला 31,154 डॉलर बक्षीस देणार आहे.
त्याचबरोबर साखळी फेरीतून बाहेर झालेले संघही रिकाम्या हाताने परतणार नाही. पाच ते आठ क्रमांकावर राहणाऱ्या संघांला प्रत्येकी 270,000 डॉलर मिळतील, तर 9 आणि 10 क्रमांकावर राहणाऱ्या संघांना 135,000 डॉलर मिळणार आहेत.
टी20 महिला विश्वचषक स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत
यावेळी महिला टी20 विश्वचषक 2024 मध्ये 10 संघ सहभागी होत आहेत, ज्यांना प्रत्येकी 5 च्या दोन गटात विभागण्यात आले आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे महिला संघ आहेत. तर ब गटात बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेस्ट इंडिज या महिला संघांचा समावेश आहे.
साखळी टप्प्यातील शेवटचा सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल, तर दोन्ही गटातील टॉप-2 संघ थेट उपांत्य फेरीसाठी आपले स्थान निश्चित करतील. उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी शारजाहच्या मैदानावर खेळवले जातील, तर स्पर्धेचा अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल.
हेही वाचा-
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत जयस्वाल रचणार इतिहास! विराटही आजपर्यंत करू शकला नाही हा पराक्रम
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे 5 भारतीय गोलंदाज, दिग्गज फलंदाजाचाही समावेश
हॉकीमध्ये ‘पंजा’ पूर्ण करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार, आज यजमान चीनविरुद्ध विजेतेपदाचा सामना