30 मेपासून आयसीसीच्या 12 व्या क्रिकेट विश्वचषकाची स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे आता या विश्वचषकाच्या दृष्टीने सर्वच संघांनी योजना आखायला सुरुवात केली आहे. तसेच हा विश्वचषक जसा जवळ येत आहे तशा चर्चाही रंगू लागल्या आहेत. भारतीय संघाने सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे भारतीय संघाकडून २०१९ विश्वचषकात चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा नक्कीच उंचावल्या आहेत.
अनेक क्रिकेट तज्ञांनी तसेच माजी क्रिकेटपटूंनी अनेक तर्कवितर्कही या विश्वचषकाबद्दल लावले आहेत. यात आता भारताचा माजी कर्णधार बेंगाॅल टायगर सौरव गांगुलीचाही समावेश झाला आहे. त्याने या विश्वचषकासाठी त्याच्या दृष्टीने भारताचा संघात कोणाला स्थान मिळावे आणि कोणाला नाही याबद्दल मते मांडली आहेत.
विश्वचषकासाठी एमएस धोनीसह दुसरा यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत असे पर्याय भारताकडे आहेत. त्यामुळे यावर सध्या भारतीय क्रिकेट जगतात चर्चा होत आहे. परंतु गांगुलीच्या संघात धोनीसोडून कोणताही स्पेशलिस्ट यष्टीरक्षक नाही.
याबरोबरच गांगुलीने विश्वचषकासाठी त्याच्या दृष्टीने भारताचा संघात चार वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांना प्राधान्य दिले आहे. फिरकी गोलंदाजांमध्ये त्याने युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांचा विचार केला आहे. तर मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार हे वेगवान गोलंदाजांच्या फळीत आहेत.
विजय शंकर, हार्दिक पंड्या आणि केदार जाधवसारखे तीन अष्टपैलू खेळाडू असलेल्या संघात रविंद्र जडेजाला मात्र स्थान देण्यात आलेले नाही.
असा आहे सौरव गांगुलीचा विश्वचषकासाठी भारताचा संभाव्य संघ –
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अंबाती रायडू, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, विजय शंकर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, केएल राहुल आणि उमेश यादव






