भारताने काल संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन हात करेल.
हा अंतिम सामना १८ जूनपासून क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्डसच्या मैदानावर खेळवला जाण्याचे आयसीसीचे नियोजन होते. मात्र आता यात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. अंतिम फेरीचे आयोजन स्थळ बदलण्याचा आयसीसी विचार करत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे लॉर्डसच्या मैदानाला आपले आयोजनपद गमवावे लागू शकते.
‘हे’ आहे कारण
काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कोरोना विषाणूची परिस्थिती लक्षात घेऊन आयसीसी हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अंतिम सामना इंग्लंडमध्येच खेळवला जाईल, मात्र लॉर्डसशिवाय इतर ठिकाणांचा विचार आयसीसी करत असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आयोजन स्थळाची घोषणा लवकरच करण्यात येईल. आयसीसीच्या विचारात लॉर्डस नाहिये. आयसीसी इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी आणि मेडिकल स्टाफशी चर्चा केल्यानंतर अंतिम स्थळाविषयी निर्णय घेईल.”
बायो बबलच्या नियमांमुळे आयसीसी हा निर्णय घेऊ पाहते आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मागील वर्षी ज्या पद्धतीने बायो बबलची निर्मिती केली होती, त्याच प्रकारची ही प्रक्रिया असेल. मागील वर्षी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने साऊदम्प्टन आणि मँचेस्टरमध्ये बायो बबल निर्माण करून यशस्वीपणे सामने खेळवले होते. त्यामुळे कदाचित याच ठिकाणांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.
भारत-न्यूझीलंडमध्ये लढत
न्यूझीलंडच्या संघाने यापूर्वीच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली होती. त्यानंतर भारताने इंग्लंडला पराभूत करत आपलेही अंतिम सामन्याचे तिकिट पक्के केले. भारताच्या विजयासह ऑस्ट्रेलियाचे अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याचे स्वप्न भंगले. आता केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारत हे दोन युवा संघ विजेतेपदासाठी झुंजतील.
महत्वाच्या बातम्या:
INDvsENG: पंतमध्ये धोनीची आत्मा घुसली रे! त्या लाजबाव थ्रोवर सामना समालोचकही फिदा
रोहितकडून घ्यावे फलंदाजीचे धडे; इंग्लंडविरुद्ध फ्लॉप ठरलेल्या विराटला या क्रिकेटपटूचा सल्ला