भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला येत्या १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये सामने असताना शाब्दिक युद्ध रंगणार नाही, असे होतच नाही. यावेळी देखील असेच काहीसे चित्र आहे.
मर्यादित षटकांच्या मालिका खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या असल्या तरी कसोटी मालिकेत वातावरण तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. नुकतेच भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने याच अनुषंगाने वक्तव्य केले. ऑस्ट्रेलियन संघाने स्लेजिंग केले तर त्यांनाही चोख प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा गिलने दिला आहे.
“आव्हानासाठी आहे सज्ज”
भारताचा २१ वर्षीय युवा खेळाडू शुभमन गिल त्याचा आयपीएल मधील संघ असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सशी बोलत होता. कोलकाताने या मुलाखतीचा व्हिडिओ आपल्या संकेतस्थळावर टाकला आहे. यावेळी बोलताना गिल म्हणाला, “ऑस्ट्रेलियन भूमीवर मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार आहे. तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेणे नक्कीच कठीण आहे, परंतु मी या आव्हानासाठी पूर्णपणे सज्ज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच देशात जर तुम्ही धावा करू शकला, तर तुमचा आत्मविश्वास नक्कीच कैक पटीने वाढतो.”
स्लेजिंगबद्दल विचारले असता तो म्हणाला, “काही खेळाडूंना प्रत्युत्तर न देता शांत राहणे अधिक पसंत असते, तर काही खेळाडूंना त्याच क्षणी चोख प्रत्युत्तर देणे अधिक आवडते. माझा स्वभाव म्हणाल तर मी सतत प्रत्युत्तर देत नाही, मात्र अधिकचे शब्द ऐकून देखील घेत नाही. जर ऑस्ट्रेलियाने आम्हाला स्लेजिंग करून विचलित करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांनाही प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळविल्या जाणार्या या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेची सुरुवात एॅडलेडच्या मैदानावरून होणार आहे. हा पहिला सामना गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळला जाईल. शुभमन गिलबाबत बोलायचे झाल्यास त्याने सराव सामन्यात दमदार अर्धशतक झळकावून भारतीय संघातील जागेसाठी मजबूत दावेदारी उभी केली आहे. त्यामुळे येत्या मालिकेत त्याला संघात स्थान मिळणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
संबधित बातम्या:
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान
– Ind vs Aus A: शुभमन गिलचे दमदार अर्धशतक, दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघ सुस्थितीत
– कसोटी मालिकेत स्लेजिंग तर होणारच! ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाचे विधान