अहमदाबाद येथे शुक्रवार (१२ मार्च) रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला टी२० सामना पार पडला. या सामन्यात भारतावर ८ गड्यांनी मात चितपट करत इंग्लंडने मालिकेची दमदार सुरुवात केली. या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती दिली होती. त्यावर, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित नाहीतर…
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय भारतीय संघाचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागला आवडला नाही.
रोहितच्या समावेशाविषयी क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला, ‘लोक रोहितचा खेळ पाहण्यासाठी मैदानात येतात किंवा आपल्या घरात टीव्हीसमोर बसतात. लोक त्याला पाहण्यासाठी येतात आणि तो संघातच नसेल तर, सामना पाहण्यात काय मजा? मी रोहितचा मोठा चाहता आहे. तो अंतिम अकरामध्ये हवा होता. तो नसेल तर मी टीव्ही बंद करेल. माझ्यासाठी त्यानंतर सामन्याची उत्सुकता राहणार नाही.’
सामन्याच्या सुरुवातीला भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिल्या दोन सामन्यात रोहितला विश्रांती देणार असल्याचे म्हटले होते.
भारताचा दारूण पराभव
अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला मोठा पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्याने केवळ ७ बाद १२४ धावा काढू शकला होता. भारतासाठी श्रेयस अय्यरने सर्वाधिक ६७ धावा काढल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने ३ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात, जेसन रॉय व जोस बटलर यांनी ७२ धावांची सलामी देत इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. रॉयने ४९ तर बटलरने २८ धावा काढल्या. मलान (२४) व बेअरस्टो (२६) यांनी आणखी पडझड होऊ न देता इंग्लंडचा विजय साकारला. जोफ्रा आर्चरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मालिकेतील दुसरा सामना रविवारी (१४ मार्च) खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
जालीम नजर हटा ले! ‘त्या’ काकूच्या नजरेने भल्याभल्यांचे वेधले लक्ष, प्रतिक्रियांचा पडला पाऊस
सलग दुसऱ्या वर्षी आशिया चषक आयोजनात अडथळा, पाकिस्तानचा विरोध
INDvENG: तयारी विना मैदानात उतरली ‘विराटसेना’! दारुण पराभवानंतर कोहलीने दिली कबुली