पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजम सेठी यांनी पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला आहे. सेठींनी शुक्रवारी (दि. 12 मे) माध्यमांशी बोलताना आशिया चषकाचा संदर्भ देत भारताला चेतावणी दिली. त्यामागील कारण असे की, भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी जेमतेम 5 महिने बाकी आहेत.
मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (Pakistan Cricket Board) त्यात सहभागी होण्याचे कोणतेही लेखी आश्वासन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या विश्वचषकातील प्रवेशावर सध्या शंका निर्माण होत आहे. विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड वि. न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबरला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार असल्याचे म्हटले जात आहे. विश्वचषकात 15 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) अशी चुरशीची लढत पाहायला मिळेल.
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) वादात नजम सेठी (Najam Sethi) यांनी पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे. ते म्हणालेत की,
“जर आशिया चषक आमच्या अटींनुसार आयोजित केला गेला नाही, तर त्याच वेळी तिरंगी मालिका खेळवली जाईल.” मात्र, नजम सेठी यांनी या तिरंगी मालिकेचे आयोजन कोणत्या देशांसोबत करणार हे सांगण्यास नकार दिला. आशिया चषकाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. आशिया चषक कोठे आयोजित केला जाईल, यावर अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, सेठी यांनी याबाबत धक्कादायक विधान केले आहे. आशिया चषक इंग्लंडमध्येही आयोजित केला जाऊ शकतो, असा मोठा खुलासा त्यांनी यावेळी केला.
“आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद आमच्याकडे असून सामने कुठे व्हावेत याचा निर्णय आम्ही घेऊ. कदाचित आम्ही असेही म्हणू शकतो की, आम्हाला लॉर्ड्स आणि ओव्हलवर खेळायचे आहे. कारण तिथे खेळायला खूप मजा येईल,” असेही ते म्हणाले.
आम्ही तीन देशांच्या स्पर्धेचे नियोजन करत आहोत
याशिवाय सेठी यांनी तिरंगी मालिका आयोजित करण्याबाबतही यावेळी भाष्य केले. “जर पीसीबीच्या संकरित मॉडेलचा विचार केला गेला नाही आणि आम्ही आशिया चषकात खेळलो नाही, तर आम्ही त्याच कालावधीत तीन देशांच्या स्पर्धेची योजना आखू,” असे विशेष सांगितले आहे.
नुकतेच पीसीबी प्रमुख नजम सेठी दुबईमध्ये आयसीसी आणि आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत सहभागी झाले होते. त्यानंतर ते लंडनला रवाना झाले होते. मात्र, इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी आपली कोणतीही चर्चा होण्याविषयी त्यांनी स्पष्ट नकार दर्शवला. (if the asia cup happens without us we will play a tri series at the same time says najam sethi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जरा इकडे पाहा! ‘हे’ आहेत भारतातील 5 जादूई समालोचक; चौघांनी केलंय टीम इंडियाचं प्रतिनिधित्व
‘टी20 क्रिकेटमधून विराट अन् रोहितचा पत्ता कट करा…’, शास्त्रींचा बीसीसीआयला गजब सल्ला