भारतीय संघाचा बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौरा येत्या २७ नोव्हेंबरपासून वनडे मालिकेने सुरू होत आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने भारतीय कर्णधार विराट कोहलीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
फॉक्स क्रिकेटशी बोलताना कमिन्सने म्हटले की, “प्रत्येक संघात एक किंवा दोन फलंदाज असतात, त्यांची विकेट खूप महत्त्वपूर्ण असते. अधिकतर संघाच्या कर्णधारांची विकेट महत्त्वाची असते. जसे की, इंग्लंडचा जो रूट, न्यूझीलंडचा केन विलियम्सन. तुम्हाला वाटते की, जर तुम्ही त्यांची विकेट घेतली, तर सामना जिंकण्यात हे खूप महत्त्वाचे ठरेल.”
“विराट कोहलीची विकेट नेहमीच महत्त्वाची असते. समालोचक त्याच्याबद्दल सातत्याने बोलत असतात. त्यामुळे आशा आहे की, आम्ही त्याची बॅट शांत ठेवू,” असेही पुढे बोलताना कमिन्स म्हणाला.
कमिन्स मर्यादित षटके आणि कसोटी अशा दोन्ही क्रिकेट प्रकारात ऑस्ट्रेलिया संघाचा उपकर्णधार आहे. याव्यतिरिक्त तो युएईवरून आयपीएल २०२० खेळून परतणाऱ्या ११ खेळाडूंपैकी एक आहे. सध्या तो १४ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये आहे. हा आयसोलेशनचा कालावधी भारताविरुद्धच्या सिडनी क्रिकेट मैदानात होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्याच्या एक दिवसाआधी संपेल.
विशेष म्हणजे विराट कोहली कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मासाठी पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ठरलं! ‘या’ मैदानावर होणार ऑस्ट्रेलिया – भारत पहिला कसोटी सामना
ऑस्ट्रेलिया-भारत मालिकेची आतुरता शिगेला! केवळ एका दिवसात संपली ‘या’ सामन्यांची तिकीटे