इम्रान ताहिर 47 वर्षांचा झाला असला तरी टी-20 क्रिकेटमधील त्याची विक्रमी कामगिरी सुरूच आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग 2026 मध्ये ताहिरने 5 विकेट्स घेत नवा विश्वविक्रम रचला आहे. वयाच्या 47 वर्षे 166 दिवसांमध्ये 5 विकेट्स घेणारा तो टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वयस्कर गोलंदाज ठरला आहे.
याआधी हा विक्रम कुक आयलंडच्या टोमाकानुटे रितावाच्या नावावर होता. त्याने 2022 मध्ये 46 वर्षे 299 दिवसांच्या वयात 5 विकेट्स घेतल्या होत्या. आता ताहिरने त्याचा विक्रम मोडला आहे. विशेष म्हणजे, टी-20 मध्ये सर्वाधिक वयात 5 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ताहिरचे नाव तब्बल चार वेळा आहे.
ताहिर सध्या सीपीएल 2026 मध्ये गयाना अॅमेझॉन वॉरियर्सकडून खेळत आहे. लीग स्टेजच्या 31व्या सामन्यात त्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गयानाने सेंट लुसिया किंग्सला 119 धावांत गुंडाळले. परिणामी संघाने सामना 4 विकेट्सने जिंकला. ताहिरने 4 षटकांत अवघ्या 17 धावा देत 5 विकेट्स घेतल्या, तर मेहदी हसन मिराजने 3 विकेट्स मिळवल्या.
सेंट लुसिया किंग्सविरुद्ध गयानासमोर 120 धावांचे लक्ष्य होते. मात्र, हे छोटे लक्ष्य गाठतानाही गयानाची दमछाक झाली. संघाने 18.3 षटकांत 6 विकेट्स गमावत लक्ष्य पूर्ण केले. कामिल पूरनने 43 धावा करत संघाकडून सर्वाधिक धावा केल्या.
ग्लेन फिलिप्सने 40 चेंडूंत 37 धावांची खेळी केली, तर क्वेंटिन सॅम्पसनने अवघ्या 11 चेंडूंत 5 षटकार आणि 1 चौकारासह 37 धावांची तुफानी खेळी केली. मात्र, या सामन्याचा खरा हिरो ठरला तो 47 वर्षीय इम्रान ताहिर, ज्याने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीने टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला.






