बर्मिंघम| द हंड्रेड लीगमधील बर्मिंघम फिनिक्स संघासाठी सोमवारचा दिवस (०९ ऑगस्ट) अतिशय विशेष राहिला. वेल्स फायरविरुद्ध झालेल्या हंगामातील २३ व्या सामन्यात बर्मिंघम फिनिक्सने चमकदार कामगिरी करत तब्बल ९३ धावांच्या फरकाने सामना जिंकला. कर्णधार मोईन अली आणि सलामीवीर विल स्मिद यांच्यासह गोलंदाज इमरान ताहिर यानेही संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला. दरम्यान त्याने मोठा विक्रम केला आहे.
प्रथम फलंदाजी करताना बर्मिंघम संघाकडून सलामीवीर स्मिदने सर्वाधिक ६५ धावा केल्या. कर्णधार मोईननेही २८ चेंडूंमध्ये ५९ धावांची कॅप्टन्सी इनिंग खेळली. या खेळींच्या जोरावर बर्मिंघम संघाने १०० चेंडूंखेर ५ गडी गमावत १८४ धावा फळ्यावर उभारल्या.
प्रत्युत्तरादाखल वेल्श संघाची फलंदाजी चालू असताना ४२ वर्षीय गोलंदाज ताहिरने सामन्याच्या ७२ व्या चेंडूवर स्मिदच्या हातून कैस अहमदला झेलबाद केले. त्यानंतर पुढील चेंडूवर मॅट मिल्नेसला शून्य धावेवर पायचित केले. पुढे ७४ व्या चेंडूवर डेविड पायनेला सुद्धा भोपळाही न फोडू देता पव्हेलियनचा रस्ता दाखवला. पायनेच्या रुपात संघाला दहावी विकेट मिळवून देत ताहिरने संघाचा विजय निश्चित केला. तसेच यासह ताहिर द हंड्रेड लीगमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला पुरुष गोलंदाजही ठरला आहे.
एवढेच नव्हे तर, अवघ्या १०० चेंडूंच्या या सामन्यात ताहिरने हॅट्रिकसह ५ विकेट्स घेण्याचीही किमया साधली आहे. १९ चेंडूंमध्ये २५ धावा देत त्याने या विकेट्स घेतल्या आहेत. सामन्याअंती वेल्श संघाच्या सलग ३ फलंदाजांना बाद करण्यापूर्वी त्याने ग्लेन फिलिप्स (८ धावा) आणि ल्यूस डू प्लॉय (१ धाव) यांचीही विकेट घेतली होती.
https://twitter.com/thehundred/status/1424830088860815360?s=20
धोनीचा चेन्नई संघाचा आहे भाग
ताहिर हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे. मात्र आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात त्याला केवळ १ सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्यातही २ विकेट्स घेत त्याने स्वत:ला सिद्ध केले होते. २९ सामन्यानंतर स्थगित झालेला आयपीएल २०२१ चा राहिलेला हंगाम १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी ताहिरचे धमाकेदार प्रदर्शन पाहता कर्णधार धोनी नक्कीच त्याला दुसऱ्या टप्प्यात अधिक सामने खेळण्याची संधी देईल.
महत्त्वाच्या बातम्या-
थाला इज बॅक! धोनीचे चेन्नई विमानतळावर आगमन, व्हिडिओ आणि फोटो होतायेत जोरदार व्हायरल
टी२० विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाची घोषणा; विलियम्सनकडे नेतृत्त्वपद, तर ‘या’ खेळाडूंना मिळाली जागा
इंग्लंडमध्ये ‘लेडी सेहवाग’चा डंका! २२ चेंडूत ठोकलं अर्धशतक, सर्वोच्च भागिदारीचाही केला विक्रम