इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. या सामन्यापूर्वी भारतीय संघ व कर्णधार विराट कोहली यांच्यासाठी बातमी समोर आली आहे. तसेच, विराट या सामन्यात आपले बहुप्रतिक्षित ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावू शकतो.
इंग्लंडचे दोन गोलंदाज सामन्यातून बाहेर
लॉर्ड्सवर होणार्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड हा खेळताना दिसणार नाही. दुखापतीमुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह लागले असून, याबाबतचा अंतिम निर्णय सामन्याआधी घेण्यात येईल.
अँडरसन आणि ब्रॉड हे इंग्लंडचे सर्वात अनुभवी गोलंदाज नसल्याने भारतीय फलंदाजांसाठी वाट काहीशी सोपी होऊ शकते. त्यांच्या अनुपस्थितीत इंग्लंडसाठी मार्क वूड, ओली रॉबिन्सन व सॅम करन वेगवान गोलंदाजीचा भार वाहतील. यांच्यासोबत मध्यमगती गोलंदाज साकीब मेहमूद पदार्पण करण्याची शक्यता आहे. तर, एकमेव फिरकीपटू म्हणून अष्टपैलू मोईन अलीला पाचारण केले गेले आहे. एकूणच इंग्लंडची गोलंदाजी काहीशी दुबळी होईल. याचा फायदा भारतीय संघ व कर्णधार विराट कोहली उचलू शकतो.
विराटच्या शतकाचा मार्ग मोकळा
ब्रॉडपाठोपाठ अँडरसन दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा भारतीय कर्णधार विराट कोहली याला होईल. कारण, अँडरसन हा इंग्लंडमध्ये विराटला नेहमीच त्रस्त करत असतो. मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात अँडरसनने विराटला पहिल्याच चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला होता. विराटने नोव्हेंबर २०१९ नंतर एकही आंतरराष्ट्रीय शतक ठोकले नाही. त्यामुळे, इंग्लंडच्या दुबळ्या गोलंदाजीसमोर तो आपले बहुप्रतिक्षित शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ गोलंदाजाला खेळवल्यास लॉर्ड्स कसोटीत भारताचा विजय निश्चित! अद्वितीय कामगिरीची करेल पुनरावृत्ती
ENGvIND: विजयाची संधी हुकल्यानंतर आयसीसीकडून दंड, कर्णधार कोहलीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
दुसऱ्या कसोटीपूर्वी लॉर्ड्सच्या खेळपट्टीचा फोटो आला पुढे, भारतीय फलंदाजांचा लागणार कस