टी२० मालिकेत ३-० ने धुव्वा उडवल्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड हे दोन्ही संघ कसोटी मालिकेत आमने सामने येणार आहेत. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गुरुवारी (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे या संघाच्या कर्णधारपदाची भूमिका पार पाडणार आहे. या कसोटी सामन्यात अनेक मोठ मोठे विक्रम पाहायला मिळू शकतात.
कानपूर कसोटीत तुटणार हरभजन सिंगचा विक्रम
भारतीय संघाचा वरिष्ठ गोलंदाज हरभजन सिंग याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ४१७ गडी बाद केले आहेत. तो भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा तिसरा गोलंदाज आहे. परंतु, कानपूर कसोटीत हा विक्रम तुटू शकतो. जर आर अश्विनला या सामन्यात ५ गडी बाद केले, तर तो हरभजन सिंगला मागे टाकू शकतो. हरभजन सिंगने १०३ कसोटी सामन्यात ४१७ गडी बाद केले होते. तर आर अश्विनने ७९ सामन्यात ४१३ गडी बाद केले आहेत.
आर अश्विन कडे असेल मोठी संधी
इतकेच नव्हे, तर आर अश्विनला कानपूर कसोटीत ९ गडी बाद करण्यात यश आले तर, तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा ११ वा गोलंदाज ठरेल. असा कारनामा करत तो अनेक दिग्गजांना मागे टाकू शकतो. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने ४१४ ,भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगने ४१७ आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज शॉन पोलॉकने ४२१ गडी बाद केले होते. अश्विन या तिन्ही दिग्गज गोलंदाजांना मागे टाकू शकतो.
एमएस धोनीचा हा विक्रम देखील तुटणार?
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटी सामन्याचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेला देण्यात आले आहे. या सामन्यात त्याच्याकडे एमएस धोनीचा मोठा विक्रम तोडण्याची सुवर्णसंधी असणार आहे. एमएस धोनीने ९० कसोटी सामन्यात ४८७६ धावा केल्या आहेत. तर अजिंक्य रहाणेने आतापर्यंत एकूण ४७५६ धावा केल्या आहेत. जर त्याला या सामन्यात १२० धावा करण्यात यश आले, तर तो कसोटी क्रिकेटमध्ये एमएस धोनीला मागे टाकत भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारा ११ वा फलंदाज ठरू शकतो.
टीम साउदीला भारताविरुद्ध विकेट्सचे अर्धशतक करण्याची संधी
न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज टीम साउदी याने भारतीय संघाविरुद्ध ९ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ४४ गडी बाद करण्यात यश आले आहे. त्याला कानपूर कसोटीत ६ गडी बाद करण्यात यश आले, तर तो भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ५० गडी बाद करण्याचा पराक्रम करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पांड्याची जागा धोक्यात आणू शकतो ‘हा’ खेळाडू; म्हणाला, ‘मी जास्तीत जास्त षटकं टाकेल’
सिनेमाहून कमी नाही उन्मुक्त चंदची लव्हस्टोरी, विमानतळावर फिल्मी स्टाईलमध्ये सिमरनला केले होते प्रपोज






