सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २९ षटकात २ बाद १०३ धावा केल्या आहेत. तसेच १९७ धावांनी ऑस्ट्रेलिया सध्या आघाडीवर आहे. मार्नस लॅब्यूशाने आणि स्टिव्ह स्मिथ या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट पुकोस्कीच्या रुपात ६ व्याच षटकात गमावल्यानंतर आर अश्विनने डेविड वॉर्नरलाही स्वस्तात बाद केले. त्याने १० व्या षटकात वॉर्नरला पायचित केले. मात्र वॉर्नरने डीआरएस रिव्ह्यू घेतला. पण हा रिव्ह्यू भारताच्या बाजूने लागल्याने वॉर्नरला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. वॉर्नर २९ चेंडूत १३ धावा करुन बाद झाला.
यानंतर मात्र मार्नस लॅब्यूशाने आणि स्टिव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत आणखी विकेट जाऊ दिली नाही. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत ६८ धावांची नाबाद भागीदारी रचली आहे. तिसऱ्या दिवसाखेर स्मिथ २९ धावांवर आणि लॅब्यूशाने ४७ धावांवर नाबाद आहे.
पहिला धक्का झटपट –
ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात पहिला धक्का लवकर बसला आहे. भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात विल पुकोस्की आणि डेविड वॉर्नर सलामीला फलंदाजीसाठी उतरले. मात्र डावाच्या ६ व्या षटकात मोहम्मद सिराजने पुकोस्कीला १० धावांवर असताना झेलबाद केले. त्याचा झेल रिषभ पंतचा बदली यष्टीरक्षक म्हणून आलेल्या वृद्धिमान साहाने पकडला.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या ६ षटकात १८ धावा झाल्या आहेत. सध्या वॉर्नर आणि मार्नस लॅब्यूशाने खेळत आहेत.
OUT. Great ball from Siraj to draw the edge of Pucovski #AUSvIND pic.twitter.com/qMueJXR1Wf
— 7Cricket (@7Cricket) January 9, 2021
भारत ९४ धावांनी पिछाडीवर –
भारताचा पहिला डाव १००.४ षटकात २४४ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतीय संघ ९४ धावांनी पिछाडीवर पडला आहे.
भारताकडून या डावात शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने अर्धशतके केली. या दोघांनीही प्रत्येकी ५० धावा केल्या. त्यांच्या व्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला ५० धावांचा आकडा गाठता आला नाही. त्या दोघांपाठोपाठ रिषभ पंतने सर्वाधिक ३६ धावा केल्या. त्याचबरोबर रविंद्र जडेजाने नाबाद २८ धावा केल्या. तसेच भारताचे ३ क्रिकेटपटू धावबाद झाले.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जॉस हेजलवूडने २ आणि मिशेल स्टार्कने १ विकेट घेतली.
तळातील फलंदाजी गडगडली –
पंत आणि पुजारा बाद झाल्यानंतर भारताची तळातील फलंदाची गडगडली. पुजारा बाद झाल्यानंतर आर अश्विन ९३ व्या षटकात धावबाद झाला. त्याला पॅट कमिन्स आणि मार्नस लॅब्यूशानेने मिळून धावबाद केले. अश्विनने १० धावा केल्या. तर पदार्पण करणारा नवदीप सैनी ४ धावांवर असताना ९५ व्या षटकात मिशेल स्टार्कच्या चेंडूवर मॅथ्यू वेडकडे झेल देऊन बाद झाला. त्यापाठोपाठ लगेचच ९७ व्या षटकात लॅब्यूशानेने जसप्रीत बुमराहला धावबाद केले. अखेर मोहम्मज सिराजची विकेट कमिन्सच्या गोलंदाजीवर गेल्याने भारताचा डाव २४४ धावांवर संपुष्टात आला. सिराज ६ धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजा २८ धावांवर नाबाद राहिला.
पंत-पुजारा स्थिरावल्यावर बाद –
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात १८० धावा केल्यानंतर पुजारा आणि पंतने चांगली सुरुवात केली होती. मात्र नवीन चेंडू घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आक्रमण सुरु केले. दरम्यान ८५ व्या षटकात पंतच्या हाताच्या कोपराला पॅट कमिन्सचा चेंडू जोरदार लागला. त्यामुळे काहीवेळासाठी भारताचे मेडिकल स्टाफ मैदानावर आले होते. पण पंतने नंतर खेळणे कायम ठेवले. मात्र खुप काळ तो टिकू शकला नाही.
त्याला हेजलवूजडने ८८ व्या षटकात झेलबाद केले. त्याचा झेल डेविड वॉर्नरने घेतला. त्यामुळे पंतला ६७ चेंडूत ३६ धावा करुन विकेट गमवावी लागली. यानंतर लगेचच ८९ व्या षटकात अर्धशतकी खेळी केल्यावर चेतेश्वर पुजारा यष्टीरक्षक टीम पेनकडे झेल देऊन बाद झाला. त्याला कमिन्सने बाद केले. पुजाराने १७६ चेंडूत ५० धावा केल्या. त्यामुळे सध्या आर अश्विन आणि रविंद्र जडेजा ही नवीन जोडी खेळपट्टीवर आहे.
भारताच्या ९० षटकात ६ बाद २०२ धावा झाल्या आहेत.
पंत-पुजाराने सावरला डाव –
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्राखेर पहिल्या डावात ४ बाद १८० धावा केल्या आहेत. अजूनही भारत १५८ धावांनी पिछाडीवर आहे.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारताने ४५ षटकानंतर २ बाद ९६ धावांपासून खेळायला सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी नाबाद राहिलेली चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे ही जोडी फलंदाजीसाठी उतरली. मात्र चांगल्या सुरुवातीनंतरही ५५ व्या षटकात रहाणे बाद झाला. त्याला पॅट कमिन्सने त्रिफळाचीत केले. रहाणेने ७० चेंडूत २२ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला हनुमा विहारी देखील झटपट बाद झाला. तो ६८ व्या षटकात एकेरी धाव चोरण्याच्या नादात धावबाद झाला. त्याला हेजलवूडने धावबाद केले. त्याने ३८ चेंडूत ४ धावा केल्या.
विहारी बाद झाल्यानंतर रिषभ पंत फलंदाजीसाठी आला. त्याने पुजाराला भक्कम साथ दिली. दुसऱ्या दिवशी काहीसा सावध खेळणारा पुजारा तिसऱ्या दिवशी मात्र थोडा खुलून खेळताना दिसला. त्याला पंतच्या आक्रमक खेळाचीही साथ मिळाली. त्यामुळे या दोघांनी ५ व्या विकेटसाठी पहिल्या सत्राखेरपर्यंत ३८ धावांची नाबाद भागीदारी केली.
त्यामुळे तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेर भारताने ७९ षटकात ४ बाद १८० धावा केल्या आहेत. पुजारा ४२ आणि पंत २९ धावांवर नाबाद खेळत आहे.