सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून(७ जानेवारी) दुसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झाला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर (८ जानेवारी) भारताने पहिल्या डावात ४५ षटकात २ बाद ९६ धावा केल्या आहेत. भारताकडून या डावात शुबमन गिलने अर्धशतकी खेळी केली.
रोहित बाद झाल्यानंतर ३२ व्या षटकात गिलने त्याचे पहिले कसोटी अर्धशतक पूर्ण केले. त्याने १०० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर लगेचच ३३ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो पॅट कमिन्सच्या गोलंदाजीविरुद्ध झेलबाद झाला. त्याचा झेल कॅमेरॉन ग्रीनने घेतला. गिलने त्याच्या या अर्धशतकी खेळीत ८ चौकार मारले.
भारताची सलामी जोडी पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे ही नवीन जोडी खेळपट्टीवर आली. या दोघांनीही संयमी आणि सावध फलंदाजी दिवसाखेरपर्यंत आणखी विकेट जाऊ दिली नाही. दुसऱ्या दिवसाखेर कर्णधार रहाणे ४० चेंडूत ५ धावांवर आणि पुजारा ५३ चेंडूत ९ धावांवर नाबाद आहे. भारताने दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात ४५ षटकात २ बाद ९६ धावा केल्या.
रोहित-गिलची अर्धशतकी भागीदारी –
गिल आणि रोहित दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेर नाबाद राहिले होते. त्यांनी तिसऱ्या सत्राचीही चांगली सुरुवात केली. याबरोबर या दोघांनी भारताला ५० धावांचा टप्पाही ओलांडून दिला. दरम्यान दोघांच्याही बॅटमधून काही सुरेख फटके पाहायला मिळाले. रोहितने १६ व्या षटकात नॅथन लायनच्या गोलंदाजीवर एक खणखणीत षटकार आणि एक चौकार ठोकत एकूण १२ धावा वसूल केल्या होत्या.
त्यानंतर १९ व्या षटकापर्यंत या दोघांनी भारताची धावसंख्या ५० च्या वर पोहचवली. पण लायननेच गोलंदाजी केलेल्या २४ व्या षटकात रोहित बाद असल्याचे मैदानातील पंचांनी जाहीर केले. पण रोहितने रिव्ह्यू घेतल्याने त्यात दिसले की तो नाबाद आहे. मात्र रोहितला मिळालेल्या या जीवदानाचा तो फार काळ उपयोग करु शकला नाही. त्याला २७ व्या षटकात जॉस हेजलवूडने स्वत:च्याच चेंडूवर झेलबाद केले.
रोहित ७७ चेंडूत २६ धावा करुन बाद झाला. दरम्यान या खेळीत त्याने ३ चौकार आणि १ षटकार मारला. तसेच गिलसह ७० धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. तो बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी आला.
भारताने ३० षटकात १ बाद ८४ धावा केल्या असून सध्या गिल ४९ धावांवर आणि पुजारा ३ धावांवर नाबाद खेळत आहे.
गिल – रोहितची चांगली सुरुवात
गिल आणि रोहितने भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली. काही शानदार फटके खेळताना यांनी दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेर भारताला ९ षटकात बिनबाद २६ धावा करुन दिल्या. गिलने दुसऱ्या सत्राखेर ३ चौकारांसह १४ आणि रोहितने २ चौकारांसह ११ धावा केल्या आहेत. हे दोघेही नाबाद खेळत आहेत.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३८ धावांवर संपुष्टात
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०५.४ षटकात ३३८ धावांवर संपुष्टात आला आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने शतक तर मार्नस लॅब्यूशाने आणि पदार्पण करणाऱ्या विल पुकोस्कीने अर्धशतकी खेळी केली.
स्मिथने २२६ चेंडूत १३१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १६ चौकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त मार्नस लॅब्यूशानेने १९६ चेंडूत ९१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ११ चौकार मारले. याबरोबरत पुकोस्कीने ११० चेंडूत ६२ धावांची खेळी केली. तसेच पुकोस्की आणि लॅब्यूशाने यांच्यात १०० धावांची भागीदारी झाली. याबरोबरच लॅब्यूशानेे आणि स्मिथमध्ये देखील १०० धावांची भागीदारी झाली. या तिघांशिवाय अन्य फलंदाजांना मोठी कामगिरी करता आली नाही.
भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि नवदीप सैनीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने १ विकेट घेतली. तर स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या १० व्या विकेटच्या रुपात धावबाद झाला.
तळातील विकेट्स झटपट –
ऑस्ट्रेलियाने ८ वी विकेट मिशेल स्टार्कच्या रुपात गमावली. त्याने ३० चेंडूत २४ धावांची आक्रमक खेळी केली. त्याच्या पाठोपाल नॅथन लायन शुन्यावर पायचीत झाला. अखेरची विकेट स्मिथच्या रुपात गेली.
९८ षटकात ७ बाद २९१ धावा केल्या आहेत. स्टिव्ह स्मिथचे शतक पूर्ण झाले आहे. तसेच तो अजूनही खेळत आहे.
स्टिव्ह स्मिथचे शतक –
दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीच ऑस्ट्रेलियाला कर्णधार टीम पेनची विकेट गमवावी लागली. तो १० चेंडू खेळून केवळ १ धावा करुन बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने डावाच्या ८९ व्या षटकात त्रिफळाचीत केले. त्यानंतर ९५ व्या षटकात पॅट कमिन्सला जडेजाने त्रिफळाचीत केले. तो १३ चेंडू खेळून शुन्यावर बाद झाला.
पण असे असले तरी स्मिथ चांगल्या लयीत खेळत होता. स्मिथने ९८ व्या षटकात त्याचे शतक पूर्ण केले. त्याने २०१ चेंडूत १३ चौकारांसह त्याचे कारकिर्दीतील २७ वे कसोटी शतक पूर्ण केले. त्याच्या या शतकासह ऑस्ट्रेलियाने २९० धावांचा टप्पाही पार केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ९८ षटकात ७ बाद २९१ धावा झाल्या आहेत.
स्मिथचे अर्धशतक, पहिल्या सत्राखेर ऑस्ट्रेलियाच्या ८४.५ षटकात ५ बाद २४९ धावा –
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने २ बाद १६६ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. पहिल्या दिवसाखेर नाबाद असलेले स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने यांनी दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेत थोडा सावध खेळत केला. दुसऱ्या दिवशी सुरुवातीच्या ११ षटकात त्यांनी २२ धावा काढल्या. पण त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्यानंतर काहीवेळ खेळ थांबला.
पावसाच्या व्यत्ययानंतरही स्मिथ आणि लॅब्यूशाने चांगल्या लयीत वाटत होते. मात्र डावाच्या ७१ व्या षटकात रविंद्र जडेजाने पाचव्या चेंडूवर लॅब्यूशानेला बाद केले आणि भारताच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. त्याचा झेल स्लीपमध्ये असलेल्या भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने घेतला. त्यामुळे लॅब्यूशाने १९६ चेंडूत ९१ धावांची खेळी करुन बाद झाला. त्याचे शतक ९ धावांनी हुकले. पण त्याच्यात आणि स्मिथमध्ये १०० धावांची भागीदारी तिसऱ्या विकेटसाठी झाली.
त्यानंतर मॅथ्यू वेड फलंदाजीसाठी आला. ७२ व्या षटकात स्मिथने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने हे अर्धशतक ११६ चेंडूत पूर्ण केले. मात्र, काहीवेळातच वेडलाही जडेजाने बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. वेड केवळ १३ धावा करुन जसप्रीत बुमराहकरवी झेलबाद झाला. असे असले तरी स्मिथ चांगल्या लयीत दिसत होता. त्याने काही शानदार फटकेही मारले.
पण दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात लॅब्यूशाने बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ५ वी विकेटही झटपट गमावली. कॅमेरॉन ग्रीन २१ चेंडू खेळल्यानंतर शुन्यावर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याची विकेट गेल्यानंतर लगेचच पंचांनी पहिले सत्र संपल्याचे घोषित केले.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेरपर्यंत ऑस्ट्रेलियाने ८४.५ षटकात ५ बाद २४९ धावा केल्या आहेत. तसेच स्मिथ ७६ धावांवर नाबाद खेळत आहेत.