टीम इंडियानं टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 फेरीत पहिला विजय नोंदवला आहे. बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर भारतीय संघानं अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. भारताचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 20 षटकांत 181/8 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, अफगाणिस्तानचा संघ 20 षटकांत 134 धावांवर गारद झाला. भारताच्या या दमदार विजयात पाच खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सूर्यकुमार यादव – मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवनं या सामन्यात झंझावाती अर्धशतक झळकावलं. त्यानं 28 चेंडूत 53 धावांची खेळी खेळली. आपल्या या खेळीत त्यानं 5 चौकार आणि 3 षटकार मारले. भारतानं 90 धावांवर चार विकेट गमावल्या असताना सूर्यानं जबाबदारी स्वीकारत चांगली फलंदाजी केली. त्यानं हार्दिक पांड्यासोबत पाचव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी करून भारताला मजबूत स्थितीत आणलं. या उत्कृष्ट फलंदाजीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
हार्दिक पांड्या – या सामन्यात स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्यानं संयमी फलंदाजी केली. हार्दिकनं सूर्याला साथ दिली नसती तर कदाचित भारताचा डाव गडगडला असता. हार्दिकनं 24 चेंडूत 32 धावा केल्या. आपल्या या खेळीत त्यानं 3 चौकार आणि 2 षटकार मारले. हार्दिकनं गोलंदाजी देखील केली. त्याला विकेट मिळाली नसली तरी त्यानं 2 षटकांत केवळ 13 धावा दिल्या.
जसप्रीत बुमराह – स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं पुन्हा एकदा शानदार स्पेल टाकला. त्यानं 4 षटकांत केवळ 7 धावा देत तीन विकेट घेतल्या. बुमराहनं दुसऱ्याच षटकात रहमानउल्ला गुरबाजला (11) बाद करून अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला. त्यानं पाचव्या षटकात सलामीवीर हजरतुल्ला झाझईला (22) बाद केलं. तर 16व्या षटकात नजीबुल्ला झद्रानला (19) आपल्या जाळ्यात पायचीत केलं.
अर्शदीप सिंग – या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनंही तीन बळी घेतले. त्यानं खालच्या फळीत फलंदाजीला आलेल्या खेळाडूंना स्वस्तात माघारी पाठवलं. अर्शदीपने कर्णधार राशिद खान (2), नूर अहमद (12) आणि नवीन उल हक (0) यांना बाद केलं. या सामन्यात अर्शदीपचं पहिलं षटक चांगलं गेलं नव्हतं, ज्यात त्यानं 13 धावा दिल्या. मात्र अर्शदीपनं शानदार पुनरागमन करत 3 विकेट घेतल्या.
कुलदीप यादव – फिरकीपटू कुलदीप यादव या विश्वचषकात पहिलाच सामना खेळत होता आणि त्यानं प्रभावी कामगिरी केली. त्यानं चार षटकांच्या स्पेलमध्ये 32 धावा देत गुलबदिन नायब (17) आणि मोहम्मद नबी (14) या दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. गुलबदीननं चौथ्या विकेटसाठी अजमतुल्ला उमरझाई (26) सोबत 44 धावांची तर नबीनं नजीबुल्लाहसोबत सहाव्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
बुमराह-अर्शदीपची धडाकेबाज गोलंदाजी, भारताचा अफगाणिस्तानवर 47 धावांनी दमदार विजय!
17 वर्षीय खेळाडूचा भारतीय संघात समावेश, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध करणार पदार्पण
भारताची एकदिवसीय मालिकेत 2-0 ने आघाडी, स्मृती मानधाना, हरमनप्रीत कौरचे झंझावाती शतक