भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेची बुधवारी (दि. 27 सप्टेंबर) सांगता झाली. या मालिकेतील अखेरचा सामना राजकोट येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाच्या पारड्यात पराभव पडला. ऑस्ट्रेलियाने 66 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने सामना गमावलाच, पण त्यासोबतच भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नकोसा विक्रम करून बसला. काय आहे त्याचा नकोसा विक्रम, जाणून घेऊयात…
या सामन्यात ऑस्ट्रेलिया (Australia) संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी 50 षटकात 352 धावांचा डोंगर उभारला होता. या सामन्यात एक सामन्याच्या विश्रांतीनंतर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने पुनरागमन केले होते. बुमराहने यावेळी पुनरागमनाच्या सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना 3 विकेट्स नावावर केल्या. मात्र, त्याने यावेळी 81 धावा खर्च केल्या.
बुमराहने टाकले कारकीर्दीतील दुसरे महागडे स्पेल
भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात 10 षटके टाकताना 81 धावा खर्च केल्या. त्यामुळे ही बुमराहच्या वनडे कारकीर्दीतील दुसरे सर्वात महागडे स्पेल ठरले. त्याच्या वनडे कारकीर्दीतील सर्वात महागडे स्पेल सहा वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध कटक येथे 2017मध्ये आले होते. त्या सामन्यात बुमराहने 9 षटके गोलंदाजी करताना 81 धावा खर्च करत 2 विकेट्स नावावर केल्या होत्या. तसेच, बुमराहचे तिसरे महागडे स्पेल इंग्लंडविरुद्धच 2017मध्ये आले होते. या स्पेलमध्ये बुमराहने 79 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, बुमराहचे चौथे महागडे वनडे स्पेल ऑस्ट्रेलियाविरुद्ध आले होते. त्याने 2020मध्ये सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात 79 धावा खर्चून 1 विकेट घेतली होती.
सामन्याचा आढावा
या सामन्यात मिचेल मार्श (96), स्टीव्ह स्मिथ (74), मार्नस लॅब्यूशेन (72) आणि डेविड वॉर्नर (56) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 352 धावा केल्या होत्या. पाहुण्या संघाच्या 353 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 49.4 षटकात सर्व विकेट्स गमावत 286 धावाच करू शकला. यावेळी भारताकडून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सर्वाधिक 81, विराट कोहली 56, श्रेयस अय्यर 48 आणि रवींद्र जडेजा 35 धावा करू शकले. त्यांच्याव्यतिरिक्त इतर एकाही खेळाडूने मोठी धावसंख्या उभारली नाही. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेल याने 10 षटके गोलंदाजी करताना 61 धावा खर्चून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच, जोश हेझलवूडने 2, तर इतर चारही गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (ind vs aus 3rd ODI jasprit bumrah second most expensive spell in odis for india know here)
हेही वाचा-
चाहत्याचा शाहरुखला कोहलीबद्दल ‘तो’ प्रश्न; किंग खान म्हणाला, ‘माझं विराटवर खूप प्रेम, तो तर जावयासारखा…’
वर्ल्डकपसाठी नव्या-जुन्या खेळाडूंना घेत बलाढ्य संघांनी कसली कंबर! पाहा दहाच्या दहा Teamsचे Squad