---Advertisement---

IND vs AUS Test : पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला; तिसऱ्या दिवशी लवकर सुरु होणार सामना, भारत अद्याप ३०७ धावांनी पिछाडीवर

---Advertisement---

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून(१५ जानेवारी) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्यात शनिवारी (१६ जानेवारी) दुसरा दिवशी दुसऱ्या सत्रानंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अखेर तिसरे सत्र न खेळवताच दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय पंचांनी घेतला आहे.

दुसऱ्या सत्रानंतर ब्रिस्बेनमध्ये पावसाचा जोर जास्त असल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळाने पाऊस थांबला, मात्र मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ते घालवून मैदान सुकवण्याचा प्रयत्न करण्यात आले. पण पंचांनी मैदानाचे परिक्षण केल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यामुळे आता तिसऱ्या दिवसाचा खेळ निर्धारित वेळेपेक्षा अर्धातास आधी म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ५ वाजता सुरु होईल.

दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या पहिल्या डावात २६ षटकात २ बाद ६२ धावा झाल्या आहेत. अद्याप भारत ३०७ धावांनी पिछाडीवर आहे.

दुसऱ्या सत्राखेर भारताच्या २ बाद ६२ धावा 

ऑस्ट्रेलियाला ३६९ धावांवर सर्वबाद केल्यानंतर भारताकडून पहिल्या डावात शुभमन गिल आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजीला आले. या दोघांनी सुरुवात सकारात्म केली होती. मागील सामन्याप्रमाणेच या सामन्यातही हे दोघे चांगली भागीदारी करणार असे वाटत असतानाच पॅट कमिन्सने त्याच्या पहिल्याच षटकात शुभमनला ७ धावावंर बाद केले. शुभमनचा झेल स्टीव्ह स्मिथने घेतला.

त्यानंतर रोहित आणि चेतेश्वर पुजाराची जोडी जमली होती. त्या दोघांची ४९ धावांची भागीदारी झाली होती. दरम्यान रोहितने काही चांगले फटके खेळले होते. त्यावरुन रोहित चांगल्या लयीमध्ये असल्याचे वाटत होते. मात्र तो १९ व्या षटकात नॅथन लायनच्या गोलंदाजीवर पुलशॉट खेळताना झेलबाद झाला. त्याचा झेल मिशेल स्टार्कने घेतला. रोहितने ७४ चेंडूत ४४ धावा केल्या. यात ६ चौकारांचा समावेश आहे.

भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्याने चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने डाव सांभाळला. त्यांनी दुसऱ्या सत्राखेर आणखी विकेटचे नुकसान होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळे दुसऱ्या सत्राखेर भारताने पहिल्या डावात २६ षटकात २ बाद ६२ धावा केल्या आहेत. पुजारा ८ धावांवर आणि रहाणे २ धावांवर नाबाद आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला २६९ धावांवर संपुष्टात – 

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांवर संपुष्टात आला आहे. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्युशेनने शतक तर कर्णधार टीम पेनने अर्धशतक केले.

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात सर्वाधिक धावा मार्नस लॅब्यूशेनने केल्या. त्याने २०४ चेंडूत १०८ धावांची खेळी केली. तर कर्णधार टीम पेनने ५० धावांचे योगदान दिले. यासह मॅथ्यू वेड (४५) आणि कॅमेरॉन ग्रीन (४७) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. पण या दोघांचेही अर्धशतकं थोडक्यात हुकले. तसेच तळातील फलंदाजांपैकी मिशेल स्टार्कने नाबाद २० धावा, नॅथन लायनने २४ धावा आणि जोश हेजलवूडने ११ धावांचे योगदान दिले.

भारताकडून गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने १ विकेट घेतली.

शेपटाचा तडाखा –

ऑस्ट्रेलियाने शनिवारी ५ बाद २७४ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवसाखेर नाबाद असलेली टीम पेन आणि कॅमेरॉन ग्रीन यांची जोडी फलंदाजीसाठी उतरली. या दोघांनी सुरुवातीला उत्तम खेळ केला. पण १०० व्या षटकात टीम पेनला ५० धावांवर बाद करत शार्दुल ठाकूरने ही जोडी फोडली. या जोडीने ६ व्या विकेटसाठी ९८ धावा जोडल्या. पेन बाद झाल्यानंतर लगेचच पुढच्या षटकात ग्रीनही ४७ धावांवर माघारी परतला. त्याला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. तर पॅट कमिन्स १०२ व्या षटकात बाद झाला. त्याला शार्दुल ठाकूरने त्रिफळाचीत केले.

त्यामुळे आता काहीवेळातच ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गुंडाळला जाणार असे वाटत असतानाच मिशेल स्टार्क आणि नॅथन लायन यांची जोडी जमली या दोघांनी ९ व्या विकेटसाठी ३९ धावा जोडल्या. तर स्टार्क आणि हेजलवूडमध्ये शेवटच्या विकेटसाठी १५ धावांची भागीदारी झाली. अखेर हेजलवूडला टी नटराजनने त्रिफळाचीत करुन ऑस्ट्रेलियाचा डाव ३६९ धावांवर संपुष्टात आणला. याबरोबरच पहिले सत्रही संपले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---