रविवारी (दि. 3 डिसेंबर) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेचा अखेरचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 धावांनी विजय मिळवला. तसेच, मालिका 4-1ने आपल्या नावावर केली. या सामन्यातील विजयाचा शिल्पकार अक्षर पटेल ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच, रवी बिश्नोई मालिकावीर ठरला. या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव खूपच खुश झाला. त्याने मोठे विधान केले.
काय म्हणाला सूर्या?
भारतीय संघाने (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो म्हणाला, “ही खरंच खूप चांगली मालिका होती. आमच्या खेळाडूंनी ज्याप्रकारे क्षमता दाखवली, ती कौतुकास्पद आहे. आम्हाला निर्भीड व्हायचे होते, जेव्हा आम्ही मध्यात होतो, तेव्हा आम्हाला फक्त सामन्याचा आनंद घ्यायचा होता. मी सर्व खेळाडूंना म्हणालो की, ‘जे योग्य आहे ते करा, आणि आपल्या खेळाचा आनंद घ्या.’ त्यांनीही तसेच केले, त्यामुळे मी खूपच खुश आहे.”
यासोबतच सूर्या म्हणाला की, “जर तो (वॉशिंग्टन सुंदर) असता, तर हा एक प्लस पॉईंट झाला असता. चिन्नास्वामी मैदानावर 200 हून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणे सोपे आहे. 160-175 इथे कठीण आव्हान सांगितले गेले आहे. 10 षटकानंतर मी खेळाडूंना म्हणालो की, आपले सामन्यातील आव्हान अजूनही जिवंत आहे.”
ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव
पाचव्या टी20 सामन्यात नाणेफेक गमावत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावत 160 धावा केल्या होत्या. यावेळी भारताकडून कोणताही सलमावीर खास प्रदर्शन करू शकला नाही. मात्र, तिसऱ्या स्थानी उतरलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने संघाचा डाव सावरत मोठी धावसंख्या उभी करण्यात सिंहाचा वाटा उचलला. तसेच, अक्षर पटेल (Axar Patel) यानेही त्याची साथ दिली.
अय्यरने सामन्यात 37 चेंडूत 53 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 2 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. तसेच, अक्षरने 21 चेंडूत 31 धावा केल्या. जितेश शर्माच्या बॅटमधून 16 चेंडूत 24 धावा निघाल्या. या खेळाडूंच्या जोरावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियापुढे समाधानकारक धावसंख्या उभी करू शकला. यावेळी भारतीय गोलंदाजांनीही शानदार प्रदर्शन केले. भारताच्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ 20 षटकात 8 विकेट्स गमावत 154 धावाच करू शकला. अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगने 1 विकेट घेत 3 धावा खर्च केल्या. त्यामुळे भारताने हा सामना सहजरीत्या 6 धावांनी जिंकला. (ind vs aus 5th t20 match skipper suryakumar yadav statement on washington sundar after winning the t20 series against australia)
हेही वाचा-
फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांनी रोखलं! अखेरच्या सामन्यात सूर्याच्या सेनेचा 6 धावांनी विजय, मालिका 4-1ने खिशात
अर्रर्र! विराटचा मोठा रेकॉर्ड मोडता-मोडता वाचला, ऋतुराजला कमी पडल्या फक्त 9 धावा