सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत आमने-सामने आहेत. मालिकेतील अखेरचा म्हणजेच पाचवा सामना रविवारी (दि. 3 नोव्हेंबर) बंगळुरूत खेळला जाणार आहे. या सामन्याबद्दल भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा याने या सामन्यात चांगले प्रदर्शन केले, तर तो टी20 विश्वचषकात आपली मजबूत दावेदारी ठोकेल.
रायपूर येथे पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात जितेश शर्मा (Jitesh Sharma) याने वादळी फलंदाजी केली होती. त्याने अवघ्या 19 चेंडूंचा सामना करताना 35 धावा चोपल्या होत्या. त्याची रिंकू सिंग (Rinku Singh) याच्यासोबत शानदार भागीदारी झाली होती. त्यामुळे भारतीय संघ 20 षटकात 9 विकेट्स गमावत 174 धावा करण्यात यशस्वी झाला होता.
आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्यानुसार, जितेश शर्माने पाचव्या सामन्यातही चांगली फलंदाजी केली, तर तो टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेसाठी आपली मजबूत दावेदारी ठोकू शकतो. त्याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “जितेश शर्मासाठी ही मोठी संधी आहे. इशान किशन एक गन प्लेअर आहे आणि त्याने पहिल्या दोन सामन्यात अर्धशतक केले होते. मात्र, मोठी बातमी ही आहे की, जर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळला, तर इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणार नाही. अशात जो यष्टीरक्षक पाचव्या किंवा सहाव्या स्थानी खेळेल, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाईल. त्यामुळे जितेशसाठी ही मोठी संधी आहे.”
मालिकेत भारताची आघाडी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून मालिका 4-1ने जिंकण्याचा प्रयत्न करेल. तसेच, मॅथ्यू वेड याच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ विजय मिळवून मालिका 2-3 अशी सोडवण्याचा प्रयत्न करेल. (ind vs aus jitesh sharma has a huge opportunity in 5th t20i says former cricketer)
हेही वाचा-
‘तो त्या लायकीचाच नाही…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा वॉर्नरवर हल्लाबोल, वाचा का साधला निशाणा
‘जर द्रविडला एक्सटेन्शन हवे असेल तर देऊन टाका, नाही तर…’, हे काय बोलून गेला गौतम गंभीर?, वाचा