मेलबर्न। शनिवारपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना या दोन देशांतील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर सोमवारी(२८ डिसेंबर) ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ६६ षटकात ६ बाद १३३ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचे महत्त्वाचे फलंदाज या डावात लवकर बाद झाले.
ऑस्ट्रेलियाने ५० षटकांच्या आतच ६ विकेट्स गमावल्यानंतर मात्र युवा अष्टपैलू क्रिकेटपटू कॅमेरॉन ग्रीन आणि पॅट कमिन्सने आणखी पडझड होऊ दिली नाही. त्यांनी काही आक्रमक फटकेही खेळले. यासह त्यांनी १३१ धावांची पिछाडी भरुन काढत ऑस्ट्रेलियाला आघाडीवर नेले आहे. सध्या ऑस्ट्रेलिया २ धावांनी आघाडीवर आहे.
ग्रीन धावांवर १७ नाबाद आहे. तर कमिन्स १५ धावांवर नाबाद आहे. भारताकडून सोमवारी रविंद्र जडेजाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर उमेश यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि आर आश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
५० षटकात ऑस्ट्रेलियाच्या ६ विकेट्स –
स्मिथ बाद झाल्यानंतर हेड आणि वेडने ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी ३४ ते ३८ या पाच षटकात एकेरी-दुहेरी धावांवर भर देताना एकूण १३ धावा काढल्या. पण त्यानंतर ३९ ते ४३ या षटकात अश्विन आणि जडेजा या फिरकीपटूंच्या जोडीने त्यांना फार धावा करु दिल्या नाही. या दरम्यान दोघांनी प्रत्येकी १ षटक निर्धाव टाकताना केवळ ६ धावा दिल्या.
ऑस्ट्रेलियाला ४४ व्या षटकात मोठा धक्का बसला. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जडेजाने मॅथ्यू वेडला पायचीत केले. यावर वेडने रिव्ह्यू घेतला होता. मात्र त्याला रिव्ह्यू वाया गेला. तो रिव्ह्यूमध्ये बाद असल्याचे दिसले. वेडने ४० धावा केल्या. त्यानंतर ४५ वे षटक अश्विनने निर्धाव टाकले, ४६ वे षटक रविंद्र जडेजाने निर्धाव टाकले.
रहाणेने ४७ वे षटक मोहम्मद सिराजकडे सोपवला. त्यानेही चांगली गोलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर ट्रेविस हेडला बाद केले. हेडचा झेल मयंक अगरवालने घेतला. हे़डने १७ धावा केल्या. या षटकात केवळ १ धाव निघाली. ४८ व्या षटकात ऑस्ट्रेलियाला पुढचा धक्का बसला. जडेजाने टाकलेल्या या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन बाद झाला. त्याच्या बॅटला चेंडू लागून तो थेट यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातात गेला. पेन १ धाव करुन बाद झाला. या षटकात २ धावा निघाल्या.
युवा कॅमेरॉन ग्रीनने ४९ व्या षटकात केवळ १ धाव काढली. तर ५० व्या षटकात जडेजाने २ धावा दिल्या.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ५० षटकानंतंर ६ बाद १०४ धावा केल्या असून ते अजून २७ धावांनी पिछाडीवर आहेत. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीन २ धावांवर आणि पॅट कमिन्स २ धावांवर नाबाद आहे.
बुमराहने केला स्मिथचा अडथळा दूर
दुसऱ्या सत्राखेर ६५ धावांनंतर तिसऱ्या सत्रात स्मिथ आणि वेडने चांगली सुरुवात केली होती. पण त्याचवेळी जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने त्यांन जखडून ठेवले होते. त्यांनी २९ आणि ३० व्या षटकात केवळ प्रत्येकी १ धाव दिली. त्यानंतर ३१ वे षटक बुमराहने निर्धाव टाकले. तर ३२ व्या षटकात शेवटच्या चेंडूवर वेडने चौकार वसूल केला. मात्र ३३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला.
बुमराहने टाकलेल्या या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्मिथ त्रिफळाचीत झाला. यावेळी एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. बुमराहने वेगाने टाकलेल्या चेंडूने लेग स्टंपवरील बेल्सला स्पर्श केला, त्यामुळे ती बेल्स खाली पडली. पण स्मिथच्या मात्र बेल्स पडल्याचे लक्षातच आले नाही. त्यामुळे तो धाव घेण्यासाठी धावला. विशेष म्हणजे त्यावेळी कोणालाच नक्की काय झाले हे कळाले नव्हते. मात्र रिप्लेमध्ये अखेर स्मिथ त्रिफळाचीत झाला असल्याचे दिसल्याने अखेर त्याला बाद देण्यात आले. स्मिथने ८ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर ट्रेविस हेड फलंदाजीला आला.
अश्विनने पुढच्या षटकात २ धावा दिल्या. तर ३५ व्या षटकात वेडने तिहेरी धाव घेतली.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ३५ षटकांनंतर ३ बाद ८१ धावा केल्या असून ते अजूनही ५० धावांनी पिछाडीवर आहेत. सध्या वेड ३४ धावांवर आणि ट्रेविस हेड ६ धावांवर नाबाद खेळत आहे.
दुसऱ्या सत्राखेर ऑस्ट्रेलियाच्या २८ षटकात ६५ धावा
भारताने पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरली आहे. यावेळी पहिल्या ४ षटकांच्या आतच ऑस्ट्रेलियाने जो बर्न्सची विकेट गमावली. बर्न्स डावाच्या चौथ्या षटकात उमेश यादवच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल यष्टीरक्षक रिषभ पंतने घेतला. यानंतर मार्नस लॅब्यूशाने फलंदाजीसाठी आला.
त्याने सलामीवीर मॅथ्यू वेडसह ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ६ ते १० षटकात काही उत्तम फटके मारताना १३ धावा काढल्या. दरम्यान ८ वे षटक टाकताना उमेश यादव दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे या षटकातील शेवटचे तीन चेंडू सिराजने टाकले.
तसेच पुढील ५ षटकातही लॅब्यूशाने आणि वेडने १३ धावा काढल्या. यावेळी लॅब्यूशाने काहीसा खुलून खेळताना दिसला. मात्र असे असतानाच तो १८ व्या षटकात बाद झाला. तो आर अश्विनच्या गोलंदाजीवर फटका मारताना स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद झाला. त्याने २८ धावा केल्या. त्यानंतर स्मिथ फलंदाजीला आला. त्याने आणि वेडने १९ आणि २० व्या षटकात प्रत्येकी २ धावा काढल्या.
त्यानंतर २१ व्या षटकात वेडने चौकार मारत एकूण ५ धावा काढल्या. २२ व्या षटकात मात्र अश्विनविरुद्ध २ धावाच काढण्यात वेडला यश आले. सिराजने गोलंदाजी केलेल्या २३ व्या षटकात स्मिथने ३ धावा काढल्या. २४ व्या षटकातही अश्विनविरुद्ध स्मिथ आणि वेडला २ धावाच करता आल्या. २५ व्या षटकातही वेडने २ धावा काढल्या.
पुढील ३ षटकात स्मिथ आणि वेडला केवळ ५ धावा काढता आल्या. त्यामुळे तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेरपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २८ षटकात २ बाद ६५ धावा केल्या असून ते अजून ६६ धावांनी पिछाडीवर आहेत. त्यांच्याकडून वेड २७ धावांवर आणि स्मिथ ६ धावांवर नाबाद खेळत आहेत.
भारताने घेतली मोठी आघाडी
भारताचा पहिला डाव ३२६ धावांवर संपुष्टात आला आहे. याबरोबरच भारताने १३१ धावांची आघाडी घेतली आहे.
सोमवारी तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला जडेजा आणि रहाणेने चांगली सुरुवात केली होती. मात्र चांगल्या सुरुवातीनंतरही ते दोघे बाद झाल्यानंतर भारताचा पहिला डाव गडगडला. १०५ षटकापर्यंत भारताने ६ बाद ३०६ धावा केल्या होत्या. त्यानंतर जडेजा अर्धशतक झाल्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात १०७ व्या षटकात बाद झाला. त्यापाठोपाठ ११४ व्या षटकात उमेश यादव ९ धावा करुन तर अश्विन ११५ व्या षटकात १४ धावांवर झेलबाद झाले. त्या पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराही पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला.
त्यामुळे भारताचा पहिला डाव ३२६ धावांवर संपुष्टात आला असून भारताने १३१ धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून अजिंक्य रहाणेने ११२ धावांची शतकी खेळी केली. तर जडेजाने ५७ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क आणि नॅथन लायनने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्सने २ आणि जोश हेजलवूडने १ विकेट घेतली.
जडेजाचे अर्धशतक, रहाणे धावबाद
सोमवारी भारताने पहिल्या डावात ५ बाद २७७ धावांपासून खेळायला सुरुवात केली. दिवसाच्या पहिल्या काही षटकात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. ९३ वे षटक निर्धाव गेले. पण त्यानंतरच्या ३ षटकात रहाणे आणि जडेजाने मिळून १३ धावा केल्या. मात्र ९७ व्या षटकात या दोघांना एकही धाव करता आली नाही. तसेच ९८ आणि ९९ व्या षटकात या दोघांना प्रत्येकी केवळ १ धाव घेता आली. १०० व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर मात्र जेडजा आणि रहाणे चोरटी एकेरी धाव घेत असताना रहाणे धावबाद झाला. त्याला मार्नस लॅब्यूशेन आणि टीम पेनने मिळून बाद केले. रहाणेने या डावात २२३ चेंडूत ११२ धावा केल्या. यात त्याच्या १२ चौकारांचा समावेश आहे. तसेच रहाणे त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच धावबाद झाला. असे असले तरी त्याने मैदानाबाहेर जाताना खिलाडूवृत्ती दाखवत जडेजाला प्रोत्साहन दिले. रहाणे बाद झाल्यानंतर आर अश्विन फलंदाजीला आला. रहाणे आणि जडेजामध्ये १२१ धावांची भागीदारी केली.
जडेजाने १०१ व्या षटकात त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. त्याने हे अर्धशतक १३२ व्या चेंडूवर पूर्ण केले. या षटकात त्याने अश्विनसह २ धावा काढल्या. नॅथन लायनने टाकलेल्या १०२ व्या षटकातही जडेजा आणि अश्विनला २ धावाच करता आल्या. यानंतर मिशेल स्टार्क पुन्हा गोलंदाजीसाठी आला. तो काही काळ मैदानाबाहेर गेला होता. त्याला दुखापत झाली असल्याची भीती होती. मात्र तो पुन्हा मैदानावर परतल्याने ऑस्ट्रेलियाला दिलासा मिळाला.
त्याने १०३ वे षटकात गोलंदाजी करताना एकही धाव अश्विन आणि जडेजाला घेऊ दिली नाही. १०४ व्या षटकात जडेजाने चौकार ठोकत अश्विनसह लायन विरुद्ध ५ धावा काढल्या. यासह भारताच्या ३०० धावा देखील पूर्ण झाल्या. १०५ व्या षटकात ३ धावा काढण्यात जडेजा आणि अश्विनला यश आले.
भारताने पहिल्या डावात १०५ षटकानंतर ६ बाद ३०६ धावा केल्या. भारताकडून जडेजा ५७ धावांवर आणि अश्विन ४ धावांवर नाबाद आहे. तसेच भारताने १११ धावांची आघाडी घेतली आहे.