---Advertisement---

IND vs AUS ODI : धवन आणि पांड्याची झुंज व्यर्थ, पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय

On: शुक्रवार, नोव्हेंबर 27, 2020 5:43 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना शुक्रवारी (27 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 375 धावांचे विजयासाठी आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 50 षटकात 8 बाद 308 धावाच करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने या सामन्यात 66 धावांनी विजय मिळवला. तसेच 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

शिखर-हार्दिकची शतकी भागीदारी व्यर्थ

375 धावांच्या आव्हानाचा पाठलाग चांगल्या सुरुवातीनंतरही भारताची फलंदाजी ढासळली होती. भारताने सुरुवातीच्या 5 षटकातच 50 धावा धावफलकावर लावल्या होत्या. मात्र मयंक अगरवाल 22 धावा करुन बाद झाला. त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी झटपट विकेट गमावल्या. कर्णधार विराट कोहली 21, श्रेयस अय्यर 2 आणि केएल राहुल 12 धावांवर बाद झाला. या विकेट्स पटपट गेल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला होता.

पण सलीमीवीर शिखर धवनला अष्टपैलू हार्दिक पंड्याची चांगली साथ मिळाली. शिखरने 25 व्या तर हार्दिकने 23 व्या षटकात अर्धशतके पूर्ण केली. त्यामुळे भारताला 25 षटकात 180 धावा पार करण्यात यश आले आहे. मात्र शिखर 86 चेंडूत 74 धावा करुन ऍडम झाम्पाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्यानंतर काहीवेळातच हार्दिकही 76 चेंडूत 90 धावा करुन बाद झाला. या दोघांनी 5 व्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी रचली. पण हे दोघे बाद झाल्यानंतर मात्र भारतीय संघ सावरु शकला नाही. त्यामुळे भारताला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचे झाम्पा आणि हेझलवूड चमकले 

हेझलवूडने सुरुवातीला मयंक, विराट आणि श्रेयस यांच्या विकेट घेत भारताला धक्के दिले होते. त्यानंतर झाम्पाने 4 विकेट्स घेत भारताला आणखी अडचणीत आणले. ऑस्ट्रेलियाकडून अन्य 1 विकेट मिशेल स्टार्कने घेतली.

ऑस्ट्रेलियाकडून फिंच-स्मिथची शतके

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या वेळी फिंचने त्याचे वनडे कारकिर्दीतील 17 वे शतक पूर्ण केले आहे. तर स्मिथने 10 वे शतक पूर्ण केले. फिंचने 124 चेंडूत 114 धावांची शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. तर स्मिथने 66 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने 105 धावा केल्या. तसेच वॉर्नरने 69 धावांची खेळी केली तर ग्लेन मॅक्सवेलने 45 धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 374  धावा केल्या.

शमीची गोलंदाजीत चमकदार कामगिरी

भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद शमीने  सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

34 व्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा पार

या सामन्यात सलामीवीर डेविड वॉर्नर 69 धावा करत तंबूत परतल्य़ानंतर फलंदाजीला आलेल्या स्टीव्ह स्मिथसह फिंचने डाव सांभाळला. 34 व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेला भारतीय युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनींच्या दुसऱ्याच चेंडूवर स्मिथने चौकार ठोकला आणि ऑस्ट्रेलियाने 200 धावसंख्या गाठली.

स्मिथने वेगवान फलंदाजी करत अवघ्या 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

दुसऱ्या टोकाला ऍरॉन फिंच खेळपट्टीवर टिकून खेळला. त्याने फिरकीपटू युझवेंद्र चहलने टाकलेल्या डावाच्या 39 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर 2 धावा घेत शतक पूर्ण केले. हे त्याच्या कारकिर्दीतील 17 वे शतक आहे.

वॉर्नर-फिंचची शानदार सलामी –

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज डेविड वार्नर आणि ऍरॉन फिंचने सलामीला फलंदाजी केली आहे. या दोघांनीही संयमी फलंदाजी करत डावाची सुरुवात शानदार केली. बुमराह आणि शमी या अनुभवी भारतीय गोलंदाजीचा सामना करत या संघाने पहिल्या 10 षटकांत एकही बळी न गमावता 57 धावा केल्या.

पुढे या दोनही सलामीवीर फलंदाजांनी चांगली लय कायम राखली आणि 27 व्या षटकापर्यंत संघाच्या 150 धावा पूर्ण केल्या. अखेर भारतीय गोलंदाजांना 28 व्या षटकात वॉर्नरची विकेट घेण्यात यश आले. वॉर्नरला मोहम्मद शमीने यष्टीरक्षक केएल राहुलकरवी झेलबाद केले.

वॉर्नर-फिंचच्या जोडीने केला खास विक्रम

वॉर्नर आणि फिंचने दीड शतकी भागीदारी करत खास विक्रम केला आहे. ही त्यांची भारताविरुद्धची वनडेतील चौथी दीडशतकी भागीदारी होती. त्यामुळे वॉर्नर आणि फिंच यांची एखाद्या संघाविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिकवेळा दी़डशतकी भागीदारी करणारी जोडी ठरली आहे. त्यांनी हा विक्रम करताना रोहित शर्मा-विराट कोहलीच्या जोडीला आणि रोहित आणि शिखर धवनच्या जोडीला मागे टाकले आहे.

रोहित आणि विराटच्या जोडीने श्रीलंका विरुद्ध 3 वेळा वनडेत दीडशतकी भागीदारी केली आहे. तर रोहित आणि शिखरच्या जोडीने वनडेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 वेळा दीडशतकी भागीदारी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---