भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला उद्या (29 ऑक्टोबर) कॅनबेरा येथे सुरुवात होणार आहे. वनडे मालिकेनंतर आता दोन्ही संघ टी20 फॉरमॅटमध्ये आमने-सामने येणार आहेत. आशिया कप 2025 जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पुन्हा छोट्या फॉरमॅटमध्ये उतरणार आहे. आगामी टी20 वर्ल्डकप लक्षात घेता ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत निर्णायक मानली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानावर खेळताना भारताला नेहमीच मोठं आव्हान असतं आणि त्यामुळे या मालिकेत प्रत्येक सामना रोमांचक ठरण्याची शक्यता आहे.
कर्णधार सूर्यासाठी योग्य प्लेइंग इलेव्हन निवडणे हे एक आव्हान असेल. सलामी जोडी जवळपास निश्चित झाली आहे. अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिल डावाची सुरुवात करतील. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा जबाबदारी घेतील. हार्दिक पंड्या जखमी असल्याने त्याच्या जागी शिवम दुबे खेळण्याची शक्यता जास्त आहे. दुबे गोलंदाजीत दोन ते तीन ओव्हर्स टाकण्याबरोबरच मिडल ऑर्डरमध्ये जलद धावा करण्याचं काम पाहू शकतो. विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आणि जितेश शर्मा हे दोन पर्याय असून, अनुभवाच्या बळावर संजूची निवड होण्याची शक्यता अधिक आहे.
स्पिन विभागात मात्र थोडा गोंधळ कायम आहे. कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांपैकी कोणाला संधी मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. कुलदीपने अलीकडच्या काळात सातत्याने विकेट घेतल्या असल्या तरी अक्षर आणि सुंदर हे दोघे बॅटिंगमध्येही उपयोगी ठरतात. वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह निश्चित आहेत, तर वरुण चक्रवर्ती अतिरिक्त स्पिन पर्याय ठरू शकतो.
एकूणच, सूर्या ब्रिगेड युवा खेळाडूंनी भरलेली असून, त्यांच्यासाठी ही मालिका स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे. कॅनबेरात उद्या भारतीय संघ विजयाच्या मोहिमेला जोरदार सुरुवात करण्यास तयार आहे.





