भारत या वर्षाच्या अखेरीस पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024 वर दावा करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ तयारी करत असल्याने, भारतीय संघासमोर त्यांना पराभूत करण्याचे आव्हानात्मक कार्य असेल.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग चार कसोटी मालिका जिंकल्या आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियातील सलग दोन मालिका विजयाचा समावेश आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे संघातील अव्वल दोन वेगवान गोलंदाज असतील. तर तिसऱ्या वेगवान गोलंदाजासाठी मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्यात खडतर स्पर्धा पाहायला मिळेल. यासोबतच आकाश दीपही चर्चेत राहणार आहे. मात्र, भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी वेगळ्या पर्यायाचे नाव दिले आहे
एका मुलाखतीत बोलताना पारस म्हणाले की, प्रसिध्द कृष्णाला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून बघायला आवडेल. कारण तो वेगळा गोलंदाज आहे आणि चेंडू हलवू शकतो.
“कुकाबुरा हा एक वेगळा चेंडू आहे आणि 30-35 षटकांमध्ये तुम्हाला त्याचा पुरेपूर वापर करणे आवश्यक असते. कारण तेव्हाच तुम्ही विकेट घेऊ शकता. तुम्हाला अशा गोलंदाजांचा शोध घ्यावा लागेल जे संघासाठी हे कार्य करू शकतात,” असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “ऑस्ट्रेलिया बाउन्स एक मोठी भूमिका बजावेल आणि इथेच मला प्रसिद्ध कृष्णा महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करावी आणि त्यानंतर तुमच्याकडे तिसरा वेगवान गोलंदाज तयार असावा अशी माझी इच्छा आहे. ऑस्ट्रेलियात जेव्हा चेंडू 30-35 षटके जुना होतो, तेव्हा तुमच्याकडे एक गोलंदाज असावा, ज्याच्याकडे काहीतरी वेगळे असेल. ज्याच्या बाऊन्सवर तुम्ही अवलंबून राहू शकता.”
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ अनेक पर्याय तपासून पाहू शकतो. यामध्ये अनुभवी गोलंदाजांशिवाय विजयकुमार वैशाख, आवेश खान व खालील अहमद यांचा देखील विचार होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा –
प्रशिक्षक गंभीरने भारतीय संघाला दिलाय निर्भयपणे क्रिकेट खेळण्याचा ‘गुरुमंत्र’, जयस्वालचा खुलासा
इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्यावर टांगती तलवार, दुसऱ्या देशात खेळली जाऊ शकते मालिका; काय आहे कारण?
भारतीय वंशाच्या स्टार क्रिकेटपटूची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये लढतोय आयुष्याची लढाई