---Advertisement---

IND vs AUS Test : तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात बिनबाद २१ धावा; ऑस्ट्रेलियाकडे ५४ धावांची आघाडी

On: रविवार, जानेवारी 17, 2021 1:16 PM
---Advertisement---

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना शुक्रवार(१५ जानेवारी) पासून सुरु झाला आहे. या सामन्याचा रविवारी (१७ जानेवारी) तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ६ षटकांत बिनबाद २१ धावा केल्या आहेत. त्यामुळे पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह ते ५४ धावांनी पुढे आहेत.

भारताचा पहिला डाव ३३६ धावांवर संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात डेविड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस सलामीला फलंदाजीसाठी उतरले. यावेळी वॉर्नरने आक्रमक शॉट मारले. त्याने दुसऱ्या दिवसाखेर ३ चौकारांसह २२ चेंडूत २० धावा केल्या. त्याला हॅरीसने संयमी साथ दिली. या दोघांनी दिवसाखेर विकेट जाऊ दिली नाही. त्यामुळे वॉर्नर दिवसाखेर २० धावांवर आणि हॅरिस १ धावेवर नाबाद आहे.

भारताचा पहिला डाव १११.४ षटकांत ३३६ धावांवर संपुष्टात

तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव १११.४ षटकांत ३३६ धावांवर संपुष्टात आला आहे. भारताकडून या डावात शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदरने ६२ धावा करत उत्तम साथ दिली. या दोघांनाच भारताकडून ५० धावांचा टप्पा पार करता आला. तसेच रोहित शर्माने ४४ धावांचे योगदान दिले. तर अजिंक्य रहाणे(३७), मयंक अगरवाल(३८) आणि रिषभ पंत(२३) यांनी छोटेखानी खेळी करत खारीचा वाटा उचलला. त्यामुळे भारताला ३३६ धावा करण्यात यश आहे. पण भारताला पूर्ण पिछाडी भरुन काढण्यात यश आले नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला ३३ धावांची पिछाडी स्विकारावी लागली आहे.

या डावात ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

पॅट कमिन्सने केला शार्दुलचा अडथळा दूर – 

शार्दुल आणि सुंदर यांनी अर्धशतकाबरोबरच आपली शतकी भागीदारी पूर्ण केल्यानंतरही चांगला खेळ सुरु ठेवला होता. मात्र १०३ व्या षटकात अखेर पॅट कमिन्सने शार्दुलला बाद करत मोठा अडथळा दूर केला. त्याने या षटकातील वेगाने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूने शार्दुलला त्रिफळाचीत केले. त्यामुळे शार्दुलला ११५ चेंडूत ६७ धावा करुन आपली विकेट गमवावी लागली. या खेळी त्याने ९ चौकार आणि २ षटकार ठोकले.

याबरोबरच शार्दुल आणि सुंदर यांच्यात १२३ धावांची सातव्या विकेटसाठी भागीदारी रचली. या भागीदारीने भारताला सामन्यात जोरदार पुनरागमन करुन दिले आहे. शार्दुल बाद झाल्यानंतर नवदीप सैनी फलंदाजीसाठी आला आहे. पण त्याला १०८ व्या षटकात ५ धावांवर हेजलवूडने बाद केले. त्या पुढील षटकात शानदार अर्धशतकी खेळी करणारा सुंदरही मिशेल स्टार्कच्या चेंडूवर बाद झाला. त्याचा झेल युवा कॅमेरॉन ग्रीनने घेतला. सुंदरने १४४ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारला.

त्यानंतर मोहम्मद सिराजने २ चौकार मारत १० चेंडूत १३ धावा काढल्या. पण त्याला जोश हेजलवूडने ११२ व्या षटकात बाद करत भारताचा पहिला डाव ३३६ धावांवर संपुष्टात आणला.

शार्दुल-सुंदरची अर्धशतके – 

दुसऱ्या सत्रातील लय शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने तिसऱ्या सत्रातही कायम राखली होती. हे दोघेही तिसऱ्या सत्रातही तुफानी खेळ करत होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांना प्रेक्षक व्हावे लागत होते. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अनेक प्रयत्न करुनही या दोघांची भागीदारी मोडता आली नाही.

दरम्यान, शार्दुलने ९६ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नॅथन लायनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. त्याला अर्धशतक करण्यासाठी ९० चेंडू खेळावे लागले. हे त्याचे कसोटीमधील पहिले अर्धशतक आहे. याबरोबरच याच षटकात सुंदर आणि शार्दुल यांची ७ व्या विकेटसाठी शतकी भागीदारीही पूर्ण झाली.

त्याचबरोबरच ९७ व्या षटकार सुंदरनेही आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने १०८ चेंडूत त्याचे हे अर्धशतक पूर्ण केले.

भारताने ९९ षटकात ६ बाद ३०४ धावा केल्या आहेत. शार्दुल ६४ धावांवर आणि सुंदर ५३ धावांवर नाबाद खेळत आहेत.

सुंदर-शार्दुलची झुंज –

या सामन्यात भारताने पहिल्या डावात ५ विकेट्स ६५ षटकांच्या आत गमावल्या होत्या. पण त्यानंतर शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने चिकाटीने फलंदाजी केली.

मंयक बाद झाल्यानंतर रिषभ पंत देखील ६७ व्या षटकात २३ धावांवर जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल सुरेख झेल कॅमेरॉन ग्रीनने घेतला. त्यामुळे आता भारताचा डाव लवकरच संपणार असे वाटत असताना सुंदर आणि शार्दुलने चिकाटी दाखवत आक्रमक खेळ केला. या दोघांनीही दुसऱ्या सत्राखेरपर्यंत विकेट जाऊ न देता लढावू वृत्ती दाखवली. दोघांनीही ऑस्ट्रेलियन संघावर आक्रमक खेळ करत दबाव टाकून अर्धशतकी भागीदारीही केली.

तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेर भारताने ८७ षटकात ६ बाद २५३ धावा केल्या असून अजून भारत ११६ धावांनी पिछाडीवर आहे. भारताकडून शार्दुल ठाकूर ५ चौकार आणि १ षटकारासह ३३ धावांवर नाबाद खेळत आहे. तर सुंदर ५ चौकारांसह ३८ धावांवर नाबाद खेळत आहे. या दोघांनी ७ व्या विकेटसाठी नाबाद ६७ धावांची भागीदारी रचली आहे.

६५ षटकांच्या आत भारताचा अर्धा संघ तंबुत –

तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्राखेर नाबाद असलेली मयंक अगरवाल आणि रिषभ पंत ही जोडी दुसऱ्या सत्रात फलंदाजीला उतरली. मात्र दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर मयंक बाद झाला. त्याला जोश हेजलवूडने झेलबाद केले. मयंकचा झेल ३८ धावांवर दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथने घेतला.

मयंक बाद झाल्यानंतर या सामन्यातून पदार्पण करणारा वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीसाठी आला आहे. भारताने ६५ षटकात ५ बाद १७५ धावा केल्या आहेत. भारताकडून रिषभ पंत १२ धावांवर आणि वॉशिंग्टन सुंदर ६ धावांवर फलंदाजी करत आहे. भारत अद्याप १९४ धावांनी पिछाडीवर आहे.

पुजारा-रहाणे पहिल्या सत्रात बाद 

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेर भारताने पहिल्या डावात ६० षटकात ४ बाद १६१ धावा केल्या आहेत. भारत अद्याप २०८ धावांनी पिछाडीवर आहे.

भारताने २ बाद ६२ धावांपासून तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली. भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दुसऱ्या दिवसाखेर नाबाद असलेले फलंदाज मैदानात उतरले. या दोघांनीही सुरुवातीची षटके उत्तम खेळून काढली. दोघांनी भारताला १०० धावांचा टप्पाही पार करुन दिला. पण त्या दोघे तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीकडे वाटचाल करत असतानाच पुजाराला जोश हेझलवूडने डावाच्या ३९ व्या षटकात बाद केले. पुजारा यष्टीरक्षक टीम पेनकडे झेल देऊन बाद झाला. पुजाराने २५ धावा केल्या.

यानंतर मयंक अगरवाल फलंदाजीसाठी उतरला. त्याने कर्णधार रहाणेला चांगली साथ दिली. त्यामुळे भारताने धावफलक हलता ठेवला. पण या दोघांची जोडीही जमली, असे वाटत असतानाच रहाणे डावाच्या ५५ व्या षटकात मिशेल स्टार्कच्या चेंडूवर मॅथ्यू वेडकडे झेल देऊन बाद झाला. रहाणेने ३७ धावांची खेळी केली. रहाणे बाद झाल्यानंतर रिषभ पंत फलंदाजीसाठी आला आहे.

भारताने पहिल्या सत्राखेर ६० षटकात ४ बाद १६१ धावा केल्या आहेत. भारताकडून मयंक अगरवाल ३८ धावांवर आणि रिषभ पंत ४ धावांवर नाबाद खेळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---