ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना सुरु आहे. या सामन्याचा सोमवारी (१८ जानेवारी) चौथा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ३२८ धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजीसाठी उतरले. मात्र, या दोघांनी ११ चेंडूच खेळले असताना पावसाला सुुरुवात झाली. त्यामुळे या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला आहे.
चौथ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात १.५ षटकात बिनबाद ४ धावा केल्या आहेत. रोहित ४ धावांवर नाबाद आहे तर गिल शुन्य धावेवर नाबाद आहे. भारताला अजून ३२४ धावांची गरज आहे.
भारताला ३२८ धावांचे आव्हान
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ७५.५ षटकात २९४ धावांवर संपुष्टात आला असून त्यांनी पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह भारतासमोर ३२८ धावांचे आव्हान ठेवले आहे.
ऑस्ट्रेलियाकडून या डावात स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ५५ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ डेविड वॉर्नरने ४८ धावांची खेळी केली. या दोघांशियाव ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना ४० धावांचा टप्पा पार करता आला नाही. पण मार्कस हॅरिस(३८), मार्नस लॅब्यूशेन (२५), कॅमेरॉन ग्रीन (३७), टीम पेन (२७) आणि पॅट कमिन्स (नाबाद २८) यांनी छोटेखानी खेळी करत संघाच्या धावसंख्येत योगदान दिले
तसेच भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेतल्या. तसेच वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर संपुष्टात
या दिवशी दुसऱ्या सत्रादरम्यान आलेल्या पावसाच्या व्यत्ययानं काही वेळ खेळ थांबला होता. पण त्यानंतर पुन्हा तिसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला.
तिसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाल्यानंतर लगेचच मिशेल स्टार्कची विकेट मोहम्मद सिराजने ६८ व्या षटकात घेतली. त्यामुळे स्टार्कला १ धाव करुन माघारी परतावे लागले. त्यानंतर पॅट कमिन्सला नॅथन लायनने चांगली साथ दिली होती. या दोघांनी ९ व्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. पण लायनला १३ धावांवर शार्दुल ठाकूरने बाद करत ही भागीदारी डोकेदुखी ठरण्याआधीच तोडली. अखेर सिराजने जोश हेजलवूडची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर संपवला. पॅट कमिन्स २८ धावांवर नाबाद राहिला.
पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवले दुसरे सत्र –
ऑस्ट्रेलियाने ५५ षटकांच्या आत ५ विकेट्स गमावल्यानंतर पुढील २ विकेटसह लवकर गमावल्या. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या कॅमेरॉन ग्रीनला शार्दुल ठाकूरने रोहित शर्मा करवी झेलबाद केले. त्या पाठोपाठ लगेचच ६५ व्या षटकात शार्दुलने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला बाद केले. त्याचा झेल यष्टीरक्षक रिषभ पंतने घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १० षटकांच्या आत स्मिथ, ग्रीन आणि पेन यांच्या विकेट्स गमावल्या. ग्रीनने ३७ धावा तर पेनने २७ धावा केल्या.
दुसऱ्या सत्राचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क १ आणि पॅट कमिन्स २ धावांवर खेळत होता. तसेच ऑस्ट्रेलियाच्या ६६.१ षटकात ७ बाद २४३ धावा झाल्या असून त्यांनी २७६ धावांची आघाडी घेतली आहे.
स्टिव्ह स्मिथचे अर्धशतक
पहिल्या सत्रात ४ विकेट्स गमावल्यानंतर स्मिथने कॅमेरॉन ग्रीनसह संघाचा डाव सावरला. त्याने दुसऱ्या सत्रातही शानदार कामगिरी करताना ५२ व्या षटकात त्याचे ३१ वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. त्याला हे अर्धशतक करण्यासाठी ६७ चेंडू खेळावे लागले. या अर्धशतकासह त्याने कॅमेरॉन ग्रीनसह अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. पण अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर ५५ व्या षटकात मोहम्मद सिराजने स्मिथला बाद केले. सिराजने टाकलेला चेंडू स्मिथच्या ग्लव्हजला लागून स्लीपमध्ये उभ्या असलेल्या अजिंक्य रहाणेकडे गेला. त्यामुळे स्मिथ ७४ चेंडूत ५५ धावा करुन बाद झाला. तो बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन फलंदाजीसाठी आला आहे.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ५५ व्या षटकात ५ बाद १९६ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून सध्या कॅमेरॉन ग्रीन २० धावांवर तर टीम पेन ० धावांवर नाबाद खेळत आहे. यासह ऑस्ट्रेलियान २२९ धावांनी आघाडीवर आहे.
पहिल्या सत्राखेर ऑस्ट्रेलियानच्या दुसऱ्या डावात ४१ षटकात ४ बाद १४९ धावा
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद २१ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. तिसऱ्या दिवसाखेर नाबाद राहिलेले डेविड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस या दोघांनी चौथ्या दिवसाची सुरुवात केली. या दोघांनीही सुरुवातीला चांगला खेळ केला. दरम्यान हॅरिस आणि वॉर्नरने काही शानदार शॉटही खेळले. या दोघांनी डावाच्या २४ व्या षटकापर्यंतच ऑस्ट्रेलियाला ८० धावांचा टप्पा पार करुन दिला होता. मात्र, २५ व्या षटकात शार्दुल ठाकूरने मार्कस हॅरिसला यष्टीरक्षक रिषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे हॅरिस ८२ चेंडूत ८ चौकारांसह ३८ धावा करुन बाद झाला. त्यापाठोपाठ २६ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने वॉर्नरला त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यामुळे वॉर्नरचे अर्धशतक थोडक्यात हुकले. वॉर्नर ७५ चेंडूत ४८ धावा करुन बाद झाला. या खेळी दरम्यान त्याने ६ चौकार मारले.
त्यामुळे मैदानात मार्नस लॅब्यूशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांची जोडी होती. या जोडीने सुरुवात चांगली केली. लॅब्यूशेन काहीसा आक्रमक खेळत होता. त्यामुळे ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरु शकते, असे वाटत असतानाच लॅब्यूशेनला मोहम्मद सिराजने ३१ व्या षटकात बाद केले. लॅब्यूशेन २२ चेंडूत २५ धावा करुन बाद झाला. पुढे लगेचच याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मॅथ्यू वेडही शुन्यावर बाद झाला.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ दबावात आला होता. पण नंतर स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. त्यांनी पहिल्या सत्राखेर आणखी नुकसान होऊ दिले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्राखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ बाद १४९ धावा केल्या आहेत. तसेच पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलिया सध्या १८२ धावांनी पुढे आहे.