भारताचा युवा फलंदाज शुबमन गिलनं बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत शानदार शतक झळकावलं आहे. त्यानं 161 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. हे त्याचं कसोटी कारकीर्दीतील 5वं शतक आहे.
चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात शुबमनला विशेष काही करता आलं नव्हतं. तो भोपळा न फोडता बाद झाला होता. परंतु दुसऱ्या डावात त्यानं दमदार कामगिरी केली. या सामन्यात गिलच्या आधी रिषभ पंतनंही शतक झळकावलं. तो 128 चेंडूत 109 धावा करून बाद झाला. पंतनं आपल्या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकार मारले.
टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यानं रिषभ पंतसोबत शतकी भागीदारीही केली. गिलनं आतापर्यंत 12 आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली आहेत. त्यानं कसोटीत 5 शतकं झळकावली. याशिवाय त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1 शतक झळकावलं आहे.
या शतकासह शुबमन गिलनं एक खास विक्रम आपल्या नावे केला. गिल 2024 मध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज ठरला आहे. शुभमननं या वर्षात 3 शतके झळकावली. त्यानं या बाबतीत रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांना मागे टाकलं. यशस्वी आणि रोहितनं 2024 मध्ये प्रत्येकी 2 शतके झळकावली आहेत.
शुभमन गिलनं कसोटीच्या दुसऱ्या डावात सलग चौथ्यांदा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीच्या दुसऱ्या डावात त्यानं 104 धावांची खेळी केली होती. यानंतर त्यानं राजकोटमध्ये दुसऱ्या डावात 91 धावांची खेळी केली. रांची कसोटीच्या दुसऱ्या डावात त्यानं नाबाद 52 धावा केल्या होत्या. गिलनं गेल्या 8 कसोटी डावांमध्ये 3 शतकं आणि 2 अर्धशतकं झळकावली आहेत.
हेही वाचा –
रिषभ पंतचे शानदार शतक, कमबॅकच्या सामन्यात मोडला गुरु धोनीचा हा महान रेकाॅर्ड!
रिषभ पंतनं सेट केली चक्क बांगलादेशची फिल्डिंग! व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही
बर्थडे बॉय राशिद खानचा विश्वविक्रम! 53 वर्षांच्या वनडे इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज