बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत टीम इंडियाचा ‘प्रिन्स’ शुबमन गिलनं कारकिर्दीतील 5वं शतक झळकावलं. त्यानं 119 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतानं बांगलादेशसमोर विजयासाठी 515 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
टीम इंडियाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात शुबमन गिलसह रिषभ पंतनं महत्त्वाची भूमिका बजावली. पंतनं 109 धावांची शानदार खेळी खेळली. एक वेळ अशी होती जेव्हा भारतानं 67 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर गिल आणि पंत यांनी चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी करून डाव सांभाळला.
शुबमन गिलचं हे कसोटीतील सलग दुसरं शतक आहे. त्यानं यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या कसोटीत शतक झळकावलं होतं. गिलनं आजच्या खेळीत 10 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार ठोकले. यासह त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकारांचा टप्पाही पार केला.
शुबमन गिलचं 2024 मधील हे तिसरं कसोटी शतक आहे. यासह तो या वर्षी तो क्रिकेटच्या सर्वात जुन्या फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज बनला. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी यावर्षी 2-2 कसोटी शतकं झळकावली आहेत.
यासह शुबमन गिलनं 2022 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बाबर आझमला मागे टाकलं. गिलचं 2022 पासूनचं हे 12वं शतक आहे. तर बाबर 11 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील शुबमन गिलचं हे 5वं शतक आहे. तो WTC मध्ये सर्वाधिक शतकं करणारा दुसरा भारतीय आहे. या यादीत रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे.
चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर शुबमन गिलनं दुसऱ्या डावात शतक झळकावलं. यासह त्यानं विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. गेल्या 50 वर्षात, पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात शतक झळकावणारा गिल हा मायदेशातील भारताचा तिसरा खेळाडू आहे.
भारतासाठी घरच्या कसोटीत पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावात शतक (गेल्या 50 वर्षांत)
सचिन तेंडुलकर – 0, 136 विरुद्ध पाकिस्तान, चेन्नई (1999)
विराट कोहली – 0, 104* विरुद्ध श्रीलंका, कोलकाता (2017)
शुबमन गिल – 0, 119* – विरुद्ध बांगलादेश, चेन्नई (2024)
हेही वाचा –
शाकिब अल हसनचं नाव इतिहासात अजरामर! अशी कामगिरी करणारा बांगलादेशचा पहिलाच खेळाडू
रिषभ पंतनं सेट केली चक्क बांगलादेशची फिल्डिंग! व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही
पंत पाठोपाठ शुबमन गिलचंही शतक, टीकाकारांची बोलती बंद