भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून (27 सप्टेंबर) कानपूर येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारख्या वरिष्ठ भारतीय फलंदाजांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात सर्वांच्या नजरा रोहित आणि कोहलीच्या कामगिरीवर असतील. तसेच राहुलकडूनही संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. दरम्यान संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना केएल राहुलच्या फॉर्मबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
केएल राहुल दीर्घकाळ कसोटी संघात आहे, पण त्याला अद्याप कसोटी संघातील आपले स्थान निश्चित करता आलेले नाही. त्याने आतापर्यंत 51 कसोटी सामन्यांमध्ये 34.12 च्या सरासरीने 2901 धावा केल्या आहेत.
केएल राहुलच्या फॉर्मबद्दल बोलताना नायर म्हणाले, “राहुल एक महान फलंदाज आहे. जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळत असता तेव्हा तुम्हाला प्रेरणेची गरज नसते. काहीवेळा तुम्हाला फक्त दिशा दाखवावी लागते. मला वाटते की राहुलने गेल्या काही दिवसांत स्वत:सोबत थोडा वेळ घालवला आहे. तो असा आहे की ज्याला त्याचा खेळ चांगला समजतो. मला वाटते जेव्हा तो दक्षिण आफ्रिकेत होता तेव्हा त्याने भारतासाठी जबरदस्त खेळी खेळली होती.”
नायर पुढे म्हणाले, “मला वाटते की त्याची फलंदाजी समाधानकारक आहे. चेन्नईच्या दुसऱ्या डावात ज्याप्रकारे तो फलंदाजी करत होता, मला खात्री आहे की पुढे जाऊन तुम्हाला त्याच्याकडून मोठी कामगिरी पाहायला मिळेल. मला आशा आहे की गौतम गंभीर आणि मला जसे संयोजन हवे आहे, त्यानुसार राहुलही तशीच कामगिरी करू शकेल.”
दरम्यान कानपूर कसोटी सामन्यासाठी उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने दोन खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही खेळपट्ट्यांची पाहणी केली. सामन्याच्या पहिल्या दिवशीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चेन्नईतील शेवटच्या कसोटी सामन्यात भारत दोन फिरकी गोलंदाज आणि तीन वेगवान गोलंदाजांसह खेळला. आता कानपूरमध्ये भारत तीन फिरकीपटूंसह खेळल्यास अक्षर पटेल किंवा कुलदीप यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.
हेही वाचा-
“पंत उत्कृष्ट खेळाडू, तो ऑस्ट्रेलियासाठी खेळायला हवा होता”, मार्शकडून कौतुकाचा वर्षाव
रिषभ पंतची आरसीबीच्या कर्णधारपदावर नजर? यष्टीरक्षकाने सर्वकाही खरं सांगून टाकलं
21व्या शतकातील भारताची सर्वोत्तम कसोटी इलेव्हन, रोहित-धोनी सारख्या अनेक दिग्गजांना मिळाली नाही जागा!