भारत आणि बांगलादेश यांच्यात येत्या 6 ऑक्टोबरपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना ग्वालियर येथे खेळला जाईल. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा कर्णधार असेल. सूर्यासोबत हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन यांना या मालिकेत संधी मिळू शकते. तसेच रियान पराग आणि हर्षित राणा देखील भारतीय संघाचे सदस्य असू शकतात.
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयनं सूर्यकुमार यादवची भारताच्या टी20 कर्णधारपदी नियुक्ती केली. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा रेकॉर्ड खूप चांगला राहिला आहे. टीम इंडियानं जुलैमध्ये श्रीलंकेचा त्यांच्याच घरच्या मैदानावर 3-0 असा पराभव केला होता.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे. या मालिकेत अभिषेक शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांना सलामीला संधी मिळू शकते. याशिवाय संजू सॅमसनला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून जागा मिळेल. कसोटी मालिकेत खेळणाऱ्या रिषभ पंत आणि शुबमन गिल यांना आराम दिला जाऊ शकतो. याशिवाय हार्दिक पांड्याचं पुनरागमन होऊ शकतं. रियान परागनं यावर्षी दमदार कामगिरी केली आहे. त्याला मधल्या फळीत संधी मिळू शकते.
वेगवान गोलंदाजीची धुरा अर्शदीप सिंग, आवेश खान आणि हर्षित राणाच्या खांद्यावर असू शकते. तर फिरकीपटू म्हणून रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. जितेश शर्मा राखीव यष्टीरक्षक असू शकतो.
बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ – अभिषेक शर्मा, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, हर्षित राणा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी
हेही वाचा –
कानपूर कसोटी पावसानं वाहून गेल्यास WTC गुणतालिकेवर काय प्रभाव पडेल? जाणून घ्या
भारताच्या आणखी एका खेळाडूचा रस्ता अपघात, मोठ्या सामन्यातून बाहेर
हा गोलंदाज मोहम्मद शमीचा सर्वाेत्तम रिप्लेसमेंट; संजय मांजरेकरांचा धक्कादायक अंदाज