गुरुवारचा (दि. 19 ऑक्टोबर) दिवस 140 कोटी भारतीय कधीही विसरणार नाहीत. यामागील कारणच तसे आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेतील 17वा सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशला 7 विकेट्सने पराभूत तर केलेच, पण त्यासोबतच विराटने विजयी षटकार मारत आपले वनडेतील 48वे शतकही साजरे केले. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा संघाच्या प्रदर्शनावर खूपच खुश झाला. त्याने रवींद्र जडेजा याच्या क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचीही प्रशंसा केली.
काय म्हणाला रोहित?
या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सलामीला फलंदाजी करताना 40 चेंडूत 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याच्या खेळीत 2 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. रोहित सामन्यानंतर म्हणाला, “हा एक चांगला विजय होता. आम्ही आजच्या सामन्यात चांगल्याप्रकारे सुरुवात करू शकलो नव्हतो, पण मधल्या टप्प्यात आम्ही चांगले पुनरागमन केले. आजच्या सामन्यात आणि मागील दोन सामन्यात आमच्या संघाने खूप चांगले क्षेत्ररक्षण केले आहे. तसेच, आमचे गोलंदाजही विचार करून गोलंदाजी करत आहेत.”
जडेजाविषयी काय म्हणाला?
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना 38 धावा खर्चून 2 विकेट्स घेतल्या होत्या. यासोबत एक शानदार झेलही घेतला होता. याविषयी बोलताना रोहित म्हणाला की, “आजच्या सामन्यात जड्डूने (रवींद्र जडेजा) याने शानदार प्रदर्शन केले. त्याला सामनावीर पुरस्कार द्यायला पाहिजे होता, पण शतक तर शतक असते.” हार्दिक पंड्याच्या दुखापतीची माहिती देताना तो म्हणाला, “हार्दिकची दुखापत सध्या जास्त गंभीर दिसत नाहीये. आशा आहे की, तो लवकरच पुनरागमन करेल. मात्र, आम्ही उद्या पुन्हा एकदा त्याच्या दुखापतीचे आकलन करू आणि त्यानंतरच निर्णय घेऊ.”
भारतीय संघाचे दमदार प्रदर्शन
या सामन्यात बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 विकेट्स गमावत 256 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 41.3 षटकात 3 विकेट्स गमावत आव्हान पार केले. यादरम्यान विराट कोहली (Virat Kohli) याने 97 चेंडूत नाबाद 103 धावांची शानदार शतकी खेळी केली. यामध्ये 4 षटकार आणि 6 चौकारांचा पाऊस पाडला. हे त्याच्या वनडे कारकीर्दीतील 48वे शतक ठरले. विशेष म्हणजे, तो आता सचिन तेंडुलकर याच्या 49 शतकांच्या विक्रमापासून फक्त एक शतक दूर आहे. (ind vs ban world cup 2023 captain rohit sharma statement after win the match by 7 wickets against bangladesh)
हेही वाचा-
WPL साठी रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर, असे आहेत संघ
निस्वार्थी केएल! विराटच्या शतकाचे श्रेय राहुलचे, स्वतःच्या धावांचे दिले बलिदान