अहमदाबाद। इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पाहुण्या संघाच्या ११२ धावांच्या प्रत्युतरात फलंदाजी करणारा भारतीय संघ पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मजबूत स्थितीत आहे. दिवसाखेरीस भारताने ३३ षटकात ३ गडी गमावून ९९ धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून भारत केवळ १३ धावांनी पिछाडीवर आहे.
खरंतर फलंदाजी करताना भारताचा डावही एकवेळ २ बाद ३४ अशा अडचणीत सापडला होता. मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली या अनुभवी फलंदाजांनी डाव सावरला. रोहित शर्माने यावेळी आपल्या कसोटी कारकिर्दीतील बारावे अर्धशतक झळकावले. तो दिवसाखेर ५७ धावांवर नाबाद आहे. कर्णधार विराट कोहली मात्र सेट झाला असतांना २७ धावांवर जॅक लीचच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याच्यानंतर पाचव्या क्रमांकावर आलेल्या अजिंक्य रहाणेने मात्र अजून पडझड होणार नाही याची काळजी घेतली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो १ धाव काढून रोहित शर्मासह नाबाद आहे.
तत्पूर्वी तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला भारताला सावध सुरुवातीनंतर दुहेरी झटका बसला. दोन षटकातच भारताने दोन गडी गमावले. १५व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सलामीवीर शुबमन गिल जोफ्रा आर्चरच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुल करण्याच्या प्रयत्नात बाद झाला. तो ५१ चेंडूत ११ धावा काढून तंबूत परतला. त्याच्या पुढच्याच षटकातच इंग्लंडचा डावखुरा गोलंदाज जॅक लीचने भारताच्या फलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या चेतेश्वर पुजाराला पायचीत पकडले. पुजारा भोपळाही न फोडता माघारी आला होता.
भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेचा तिसरा सामना बुधवारपासून सुरु झाला आहे. हा सामना दिवस-रात्र सामना आहे. हा सामना पुर्नबांधणी करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) होत आहे. या सामन्यातील नाणेफेकीचा कौल इंग्लंड संघाच्या बाजूने पडला असून संघाचा कर्णधार जो रुटने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय भारतीय गोलंदजांनी चुकीचा ठरवत इंग्लंडचा पहिला डाव ४८.४ षटकांत ११२ धावांत संपवला.
इंग्लंडकडून या डावात जॅक क्रॉलीने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली. अन्य फलंदाजांना २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने ३ विकेट्स आणि इशांत शर्माने १ विकेट घेतली.
भारतीय फिरकीपटूंपुढे इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली…
पहिल्या सत्राखेरनंतरही इंग्लंडच्या फलंदाजांना फार काळ तग धरता आला नाही. दुसरे सत्र सुरु झाल्यानंतर सुरुवातीलाच डावाच्या २८ व्या षटकात ऑली पोपला(१) आर अश्विनने त्रिफळाचीत केले, तर बेन स्टोक्सला(६) २९ व्या षटकात अक्षर पटेलने पायचीत केले. ३५ व्या षटकात अक्षरच्या चेंडूवर जोफ्रा आर्चर(११) त्रिफळाचीत झाला. त्यानंतर ३८ व्या षटकात जॅक लीचला(३) अश्विनने बाद केले.
पुढे अक्षरने ४७ व्या षटकात २९ चेंडूत ३ धावा करणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडला तर ४९ व्या षटकात बेन फोक्सला(१२) त्रिफळाचीत केले. अँडरसन ० धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर संपुष्टात आला.
पहिल्या सत्राखेरपर्यंत इंग्लंड ४ फलंदाज बाद
मात्र, पहिल्या सत्रात भारतीय फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व असल्याचे दिसून आहे. पहिल्या सत्राखेर पहिल्या डावात इंग्लंडने २७ षटकात ४ बाद ८१ धावा केल्या आहेत. भारताकडून फिरकीपटू अक्षर पटेलने २ विकेट्स घेतल्या असून आर अश्विनने आणि इशांत शर्माने प्रत्येकी १ विकेट घेतली आहे.
सध्या इंग्लंडकडून बेन स्टोक्स १९ चेंडूत ६ धावांवर आणि ऑली पोप ८ चेंडूत १ धावेवर नाबाद आहे.
अश्विनने दूर केला रुटचा अडथळा
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिले २ विकेट्स लवकर गमावल्यानंतर जो रुट आणि सलामीवर जॅक क्रॉलीने डाव सावरला होता. या दोघे अर्धशतकी भागीदारी करण्याच्या जवळ होते. यादरम्यान आर अश्विनने भारताच्या मार्गातील जो रुटचा मोठा अडथळा दूर केला. त्याने रुटला २२ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पायचीत केले. रुट ३७ चेंडूत १७ धावा करुन बाद झाला. त्याने डीआरएसचा वापर केला होता. पण त्याच ‘अंपायर्स डिसिजन’ असा निकाल अल्याने त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
त्याच्यापाठोपाठ २५ व्या षटकात लगेचच अर्धशतक करणारा जॅक क्रॉली अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. त्याने ८४ चेंडूच ५३ धावा केल्या.
इंग्लंडला सुरुवातीला २ धक्के
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारताकडून १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांत शर्माने तिसऱ्याच षटकात डॉम सिब्लीला शुन्यावर बाद केले. त्याचा झेल दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माने घेतला. त्यानंतर ७ व्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजीसाठी आला. त्याने या सामन्यातील त्याच्या पहिल्याच चेंडूवर जॉनी बेरस्टोला पायचीत केले.
त्यामुळे सात षटकांच्या आतच इंग्लंडने २ विकेट्स झटपट गमावल्या. त्यानंतर कर्णधार जो रुट आणि सलामीवर जॅक क्रॉलीने संघाचा डाव सांभाळला आहे. इंग्लंडने १० षटकांमध्ये पहिल्या डावात २ बाद ३० धावा केल्या आहेत. जो रुट १३ चेंडूत ३ धावांवर तर जॅक क्रॉली ३३ चेंडूत २३ धावांवर नाबाद आहे.
दोन्ही संघांच्या ११ जणांच्या संघात बदल
या सामन्यासाठी भारतीय संघात इशांत शर्माला अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळाल्याने तो त्याचा कारकिर्दीतील १०० वा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.
या सामन्यासाठी इंग्लंडने ४ बदल केले आहेत. इंग्लंडने या सामन्यासाठी जेम्सन अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या दोघांनाही संधी दिली आहे. तसेच जॉनी बेअरस्टोचेही या सामन्यासाठी ११ जणांच्या भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तर जोफ्रा आर्चर हा तिसरा वेगवान गोलंदाज इंग्लंडच्या संघात आहे.
तसेच भारताने ११ जणांच्या संघात २ बदल केले असून जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी संघात पुनरागमन केले आहे. बुमराहला मोहम्मद सिराज ऐवजी तर वॉशिंग्टन सुंदरला कुलदीप यादव ऐवजी संघात स्थान देण्यात आले आहे.
भारतातील दुसराच दिवस – रात्र कसोटी सामना –
भारतातील हा दुसराच दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. याआधी कोलकाताच्या इडन गार्डन या स्टेडियमवर पहिल्यांदा भारत विरुद्ध बांगलादेश संघात दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात आला होता. तर भारतीय संघाचा हा एकूण तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. याआधी भारताने ऑस्ट्रेलियामध्ये ऍडलेड येथे देखील दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे. तर इंग्लंड संघाचा हा एकूण चौथा दिवस-रात्र कसोटी सामना असेल.
असे आहेत ११ जणांचे संघ
भारत – रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (डब्ल्यू), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह.
इंग्लंड – डोमिनिक सिब्ली, झॅक क्रॉली, जॉनी बेअरस्टो, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स (यष्टीरक्षक), जोफ्रा आर्चर, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन