भारत विरुद्ध इंग्लंड चाैथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताने 358 धावा केल्या. ज्यामध्ये तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली. भारताच्या 358 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात दिवसअखेर दोन गडी गमावून 225 धावा केल्या असून केवळ 133 धावांनी पिछाडीवर आहे. सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्रॉलीने शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर ढकललं.
डकेटने 94 धावा, तर क्रॉलीने 84 धावा करत पहिल्या विकेटसाठी 166 धावांची भागीदारी रचली. भारतीय गोलंदाजांनी दिशाहीन मारा करत इंग्लिश फलंदाजांना आक्रमक खेळ करण्याची मुभा दिली. दोघांनीही ‘बैजबॉल’चा प्रभाव दाखवत जोरदार फटकेबाजी केली.
भारताकडून रविंद्र जडेजा आणि पदार्पणवीर अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. दिवसअखेर ओली पोप 20 आणि जो रूट 11 धावांवर नाबाद आहेत.
याआधी, रिषभ पंतने दुखापत असूनही 75 चेंडूत 54 धावांची धडाकेबाज खेळी केली. चालण्यात अडचण असूनही पंतने आर्चरवर षटकार मारून आणि स्टोक्सवर चौकार ठोकून अर्धशतक पूर्ण केलं. पंतच्या या शौर्यपूर्ण खेळीला स्टेडियममधून उभं राहून टाळ्यांचा वर्षाव करण्यात आला, तर जो रूटसारख्या प्रतिस्पर्धी खेळाडूनेही त्याच्या पाठीवर थाप देत कौतुक केलं.
शिवाय शार्दुल ठाकूरनेही 41 धावा करत भारताला 350 पार नेण्यात हातभार लावला. इंग्लंडकडून स्टोक्सने 5, तर आर्चरने 3 गडी बाद केले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा आता इंग्लंड मजबूत स्थितीत आहे. आता भारताला लवकरात लवकर विकेट्स घेणं अत्यावश्यक ठरणार आहे, अन्यथा इंग्लंडचा डाव पूर्णपणे हावी होऊ शकतो.






