IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी फलंदाज विराट कोहली या मालिकेतून पूर्णपणे बाहेर गेला आहे. तर निवडकर्त्यांनी मालिकेतील तीन सामन्यांसाठी आकाश दीपचा टीम इंडियामध्ये बॅकअप वेगवान गोलंदाज म्हणून समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये होणार असून भारत आणि इंग्लंडचे संघ आतापर्यंत झालेल्या दोन कसोटीत 1-1 ने बरोबरीत आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करणाऱ्या आकाश दीपला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आकाश दीप याला आवेश खानच्या जागी संधी मिळाली आहे. तसेच आकाश दीप आता जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार यांच्यासोबत भारतीय गोलंदाजीची धुरा हाती घेणार आहे.
याबरोबरच, भारतीय संघात निवड झाल्याने आकाश दीप देखील आश्चर्यचकित झाला आहे. यावर आकाश दीपने सांगितले आहे की, मला इतक्या लवकर भारतीय संघात सामील होण्याची अपेक्षा नव्हती. तसेच, मला आशा आहे की मी चांगली कामगिरी करत राहिलो तर नजीकच्या भविष्यात माझी कसोटी संघात निवड झाली असती. पण तिसऱ्या सामन्यातच मला राष्ट्रीय संघात स्थान मिळेल, असे मला कधीही वाटले नव्हते.
आकाश दीप प्रथमच कसोटी संघाचा भाग बनला आहे. याआधी आकाश दीप दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा सदस्य राहिला आहे. आकाश दीपकडे नवीन आणि जुन्या दोन्ही चेंडूंवर स्विंग करण्याची क्षमता आहे. वेगवान गोलंदाज आकाश दीपचा जन्म 1996 मध्ये बिहारमधील रोहतास येथे झाला आहे. आकाश दीपचा आतापर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. 2007 च्या टी-20 वर्ल्ड कप भारतीय संघाने विजेतेपद पटकावले तेव्हा आकाशने ठरवले होते की, आपल्यालाही भारतासाठी क्रिकेट खेळायचे आहे. 27 वर्षीय आकाश दीपने बंगालमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे.
दरम्यान, आकाश दीपने लिस्ट-ए सामन्यांमध्ये 24.50 च्या सरासरीने आणि 30.4 च्या स्ट्राइक रेटने 42 बळी घेतले आहेत. याशिवाय 41 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 7.52 च्या इकॉनॉमी आणि 18.1 च्या स्ट्राइक रेटसह 48 विरोधी फलंदाजांना आपला बळी बनवले आहे. अलीकडेच आकाश दीप इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळताना दिसला होता. आकाश दीपने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या 3 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –