भारतीय संघाला १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध एकमात्र कसोटी सामना खेळायचा आहे. या कसोटी सामन्याच्या आधी भारतीय खेळाडूंनी लिस्टरशायर संघाविरुद्ध ४ दिवसांचा सराव सामना खेळला. रोहित शर्माही या सराव सामन्यात सहभागी होती, पण मध्येच त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सराव सामन्यातून माघार घेतल्यानंतर आता रोहितची मुलगी समायराने तिच्या प्रेमळ अंदाजात वडिलांच्या तब्येतीची माहिती दिली आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) सराव सामन्यादरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात तो उपस्थित राहणार आहे की नाही? याविषयी कसलीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. रोहित जर कसोटी सामन्यापर्यंत कोरोनातून सावरू शकला नाही, तर संघ व्यवस्थापनाने मयंक अगरवाल (Mayank Agarwal) याला त्याच्या बदली खेळाडूच्या रुपात बोलावून घेतले आहे. रोहित सध्या लिस्टरशायरच्या एका हॉटेलमध्ये त्याच्या कुटुंबासह थांबलेला आहे. परंतु कोरोना झाल्यानंतर त्याला विलगीकरणात राहावे लागत आहे.
रोहितची पत्नी रितिका सजदेह आणि त्यांची मुलगी समायरा (Rohit Sharma’s daughter Samaira) या हॉटेलमधून बाहेर जात असतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओत हॉटेलच्या लॉबीमधील एका व्यक्तीने समायराला तिच्या वडिलांच्या तब्येतीविषयी विचारणा केली. त्यावर तीन वर्षांच्या या रोहितच्या मुलीने उत्तर दिले की, “माझे डॅडी त्यांच्या रूममध्ये आराम करत आहेत.” समायराच्या या उत्तरानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Krishna19348905/status/1541428454050222081?s=20&t=cd3mGUSQEOAy8qvoCK7DSQ