भारतीय क्रिकेटला २०१६ साली एक गुणवंत फिरकी गोलंदाज मिळाला. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. परंतु या गोलंदाजाला अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाहीये. हा गोलंदाज दुसरा कोणी नसून युझवेंद्र चहल आहे. चहलला आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या ६ वर्षांनंतर देखील कसोटी संघात संधी मिळाली नसल्यामुळे इंग्लंडचा माजी दिग्गज ग्रीम स्वानने नाराजी व्यक्त केली.
एक वृत्तसंस्थेशी बोलताना इंग्लंडचा माजी वेगवाग गोलंदाज ग्रीम स्वान (Graeme Swann) म्हणाला की, “जर मी निवडकर्ता असतो, तर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला विचारले असते की, त्याला कसोटी खेळायची आहे की नाही? जर त्याने हो उत्तर दिले असते, तर मी त्याला संघात संधी दिली असती. माझ्या दृष्टीने तो विश्वस्तरीय आणि सध्या जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. परिस्थिती प्रतिकूल असली तरी, त्याच्याकडून भारतीय संघासाठी अप्रतिम लेग स्पिन गोलंदाजी पाहायला मिळते. ही कामगिरी अविश्वसनीय आहे.”