इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पाच कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडनेही 465 धावा केल्या. त्यामुळे भारताला 6 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने एकहाती कहर केला. त्याने 24.4 षटकांत 83 धावा देत 5 बळी घेतले आणि कसोटी कारकिर्दीत 14व्यांदा पाच बळींची कामगिरी केली.
या कामगिरीसोबतच बुमराह इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात एका डावात 3 वेळा पाच बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी लाला अमरनाथ, बी.एस. चंद्रशेखर, कपिल देव, भुवनेश्वर कुमार, वीनू मांकड, मोहम्मद निसार, चेतन शर्मा, इशांत शर्मा आणि सुरेंद्र नाथ यांनी प्रत्येकी दोन वेळा ही कामगिरी केली होती. बुमराहने त्यांना मागे टाकत हा विक्रम प्रस्थापित केला.
बुमराहने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली. तो SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये 150 कसोटी बळी घेणारा पहिला आशियाई गोलंदाज बनला आहे. त्याचा 150वा बळी ठरला जोश टंग.
बुमराहने लीड्स कसोटीत 2 बळी घेतल्यावर वसीम अक्रमचा विक्रम मोडीत काढला होता. SENA देशांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा आशियाई गोलंदाज ठरला होता. आता त्याने 150 बळींची विक्रमी मजल मारली आहे. यापूर्वी ही कामगिरी केवळ वेस्ट इंडीजच्या दोन महान गोलंदाजांनी केली होती.
जसप्रीत बुमराहचे सेना देशांमध्ये कसोटी विकेटेस
ऑस्ट्रेलिया – 64
इंग्लंड – 42
दक्षिण आफ्रिका – 38
न्यूझीलंड – 6






