भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना 10 जुलैपासून लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या निर्णायक सामन्यात विजय मिळवणं टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत असून भारताला आघाडी घेण्यासाठी या सामन्यात हर हालातीत विजय आवश्यक आहे. मात्र इंग्लंडचे तीन प्रमुख खेळाडू भारतासाठी मोठं आव्हान ठरू शकतात.
जो रूट – भारतासाठी सर्वात मोठा धोक्याचा इशारा
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट हा भारतासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये जो रूटने आतापर्यंत 155 सामन्यांत 13115 धावा केल्या आहेत. भारताविरुद्ध त्याने 32 टेस्ट्समध्ये 2955 धावा झळकावल्या आहेत, ज्यात 10 शतकं आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने भारताविरुद्ध 218 धावांचा वैयक्तिक सर्वोच्च स्कोर नोंदवला आहे. त्यामुळे लॉर्ड्स टेस्टमध्ये भारतीय गोलंदाजांसमोर त्याला रोखणं मोठं आव्हान असेल.
बेन स्टोक्स – अष्टपैलू खेळाडूचा प्रभाव
इंग्लंडचा सध्याचा कर्णधार बेन स्टोक्स देखील भारतासाठी मोठं आव्हान ठरू शकतो. 113 कसोटीत 6814 धावा आणि 219 बळी घेणाऱ्या स्टोक्सकडे लॉर्ड्सवरचा चांगला अनुभव आहे. भारताविरुद्ध 23 कसोटीत त्याने 1058 धावा आणि 46 विकेट्स घेतल्या आहेत. विशेषतः त्याची आक्रमक फलंदाजी आणि निर्णायक क्षणी गोलंदाजी भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते.
जोफ्रा आर्चर – वेगवान माऱ्याचा धोका
चार वर्षांनंतर कसोटी संघात परतलेला जोफ्रा आर्चर टीम इंडियासाठी मोठं आव्हान ठरू शकतो. ड्यूक बॉलचा प्रभावी वापर करत तो 140 Kmph पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करतो. इंग्लंडमध्ये खेळलेल्या 8 कसोटीत त्याने 30 विकेट्स घेतल्या असून, दोन वेळा 5 विकेट्स इनिंग घेतली आहे. भारताविरुद्ध त्याने 2 कसोटीत 4 विकेट्स घेतल्या आहेत. लॉर्ड्सच्या वातावरणात त्याचा वेग आणि स्विंग भारताच्या फलंदाजांसाठी अडचणीचं कारण ठरू शकतं.






