---Advertisement---

‘गोलंदाजीतील सुधारण्यामागे ‘या’ दोन दिग्गजांचा वाटा’, नितीश रेड्डीचा मोठा खुलासा!

On: शुक्रवार, जुलै 11, 2025 8:49 AM
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरू आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला असताना इंग्लंडने 4 बाद 251 धावा केल्या आहेत. डावाच्या सुरुवातीच्या तासाभरात भारताचे प्रमुख वेगवान गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरले आणि मग कर्णधार शुबमन गिलने चेंडू ऑलराउंडर नितीश रेड्डीच्या हातात दिला. त्याने या संधीचं सोनं करत अवघ्या एका ओव्हरमध्ये दोन मोठे बळी टिपत सामन्याचं चित्रच बदलून टाकलं.

रेड्डीने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांच्यापेक्षा अधिक प्रभावी गोलंदाजी केली. दिवस संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने आपल्या कामगिरीचं श्रेय सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स आणि भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल यांना दिलं.

रेड्डी म्हणाला “ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मला जाणवलं की माझ्या गोलंदाजीत आणि सातत्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आयपीएल 2025 दरम्यान मी माझ्या कॅप्टन पॅट कमिन्ससोबत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये कशी गोलंदाजी करावी याबद्दल चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की तिथे हवामानाचं निरीक्षण करत स्वतःचा नैसर्गिक खेळ खेळणं सर्वात महत्त्वाचं असतं.”

रेड्डीने पुढे सांगितलं, “या दौऱ्यात मोर्ने मोर्केलसोबत काम करणं खूपच उपयुक्त ठरलं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आम्ही सातत्यावर काम करत आहोत. माझ्याकडे दोन्ही दिशांना स्विंग करण्याची क्षमता आहे, पण ती सतत आणि अचूक असावी यासाठी आम्ही मेहनत करत आहोत. गेल्या 1-2 वर्षांपासून मी माझ्या गोलंदाजीवर खूप मेहनत घेतो आहे.”

इंग्लंडच्या डावाच्या 14व्या ओव्हरमध्ये नितीश रेड्डीला गोलंदाजी देण्यात आली. त्याच्या पहिल्या दोन चेंडूंवर एक चौकार गेला, पण तिसऱ्याच चेंडूवर त्याने बेन डकेटचा बळी घेत 43 धावांची भागीदारी तोडली. आणि त्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर त्याने जॅक क्रॉलीला देखील तंबूत पाठवत भारताला दुसरा मोठा विकेट मिळवून दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---