भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथ्या टी२० सामना बुधवारी (२८ जानेवारी) विशाखापट्टणम येथे खेळला गेला. भारत या ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकत ३-० अशा विजयी आघाडीवर आहे. तर चौथा सामना भारताने ५० धावांनी गमावला. या मालिकेत भारताचे अनेक फलंदाज चांगले कामगिरी करताना दिसत आहे. वेगवेगळ्या सामन्यात अनेकांनी त्यांच्या वादळी खेळीने संघाला विजय मिळवून दिला. त्यात मात्र शिवम दुबे अपयशी ठरला, असे असले तरी त्याने केलेल्या तुफानी खेळीने त्याचा दिग्गजांच्या खास यादीत प्रवेश झाला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध शिवमने २३ चेंडूत ६५ धावा केल्या. यातील एका षटाकत त्याने तब्बल २८ धावा वसूल केल्या होत्या. या सामन्यात भारत २१६ धावसंख्येचा पाठलाग करत होता, मात्र अर्धा संघ १०.३ षटकात ८२ धावसंख्येवरच गारद झाला. त्यानंतर शिवमने जबाबदारी घेत चौकार-षटकारांचा मारा करत संघाचा धावफलक हलता ठेवला.
या सामन्यात शिवमने न्यूझीलंडचा फिरकीपटू इश सोधीच्या १२व्या षटकात २ चौकार, ३ षटकार आणि दुहेरी धाव घेत एकूण २८ धावा वसूल केल्या. त्यामुळे त्याने आतंरराष्ट्रीय टी२०मध्ये सामन्याच्या एका षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या यादीत युवराज सिंग पहिल्या स्थानावर असून त्याने २००७मध्ये इंग्लंदच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ६ षटकार मारत ३६ धावा केल्या होत्या.
युवराजनंतर या यादीत संजू सॅमसनचा क्रमांक लागतो. त्याने २०२४मध्ये बांग्लादेशच्या रिशाद हुसैनविरुद्धच्या एका षटकात ५ षटकार मारत ३० धावा केल्या होत्या. रोहित २८ धावा करत तिसऱ्या स्थानावर असून शिवमने त्याची बरोबरी केली आहे.
या सामन्यात शिवमने १५ चेंडूतच अर्धशतक केले होते. हे भारताच्या खेळाडूचे आंतरराष्ट्रीय टी२०मधील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद अर्धशतक ठरले. या यादीत युवराज पहिल्या तर अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे.
एका षटकात भारतीय फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा (टी20 आंतरराष्ट्रीय)
३६ – युवराज सिंग, गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड, डर्बन २००७
३० – संजू सॅमसन, गोलंदाज रिशाद हुसेन, हैदराबाद २०२४
२८ – रोहित शर्मा, गोलंदाज मिचेल स्टार्क, ग्रॉस आयलेट २०२४
२८ – शिवम दुबे, गोलंदाज इश सोढी, विशाखापट्टणम २०२६*






