न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात भारताला ५० धावांनी पराभूत व्हावे लागले. हा पराभव भारतीय चाहत्यांसाठी निराशेचे कारण ठरला असला तरीही शिवम दुबेने त्याच्या धमाकेदार फलंदाजीने वाहवा मिळवली आहे. त्याचबरोबर त्याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत मोठ्या विक्रमाच्या यादीत प्रवेश केला आहे.
भारत या सामन्यात २१६ धावसंख्येचा पाठलाग करत होता. मागील सामन्यात चमकदार कामगिरी करणारे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव लवकरच विकेट गमावून बसले. यजमान संघाने तर १०.३ षटकात ८२ धावसंख्येवरच ५ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर शिवमने संघाचा धावफलत हलता ठेवण्याची जबाबदारी घेतली. त्याने तर इश सोधीच्या एका षटकात २८ धावा वसूल केल्या. बरोबरच रोहित शर्मा आणि सूर्यकुमारचा विक्रमही मागे टाकला.
विशाखापट्टणमच्या सामन्यात शिवमचा स्ट्राईक रेट २८२.६० होता. जो टी२०मध्ये कमीत कमी ५० धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंपैकी तिसरा सर्वोच्च ठरला. हा विक्रम करताना त्याने रोहित आणि सूर्यकुमारला मागे टाकले. आंतरराष्ट्रीय टी२०च्या एका डावात कमीत कमी ५० धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंचा सर्वोच्च स्ट्राईक रेट असणाऱ्यांची यादी पाहिली तर पहिल्या स्थानी युवराज सिंग आहे. या यादीत अभिषेक दुसऱ्या स्थानावर आहे.
युवराजने २००७मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ३६२.५०च्या स्ट्राईक रेटने ५८ धावा केल्या होत्या. अभिषेकने नुकतेच न्यूझीलंडविरुद्ध ३४०च्या स्ट्राईक रेटने नाबाद ६८ धावा केल्या होत्या. या यादीत शिवम तिसऱ्या स्थानावर आला आहे. त्याने या सामन्यात २८२.६०च्या स्ट्राईक रेटने २३ चेंडूत ६५ धावा केल्या.
सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २७७.२७च्या स्ट्राईक रेटने २२ चेंडूत ६१ धावा केल्या होत्या. रोहितने श्रीलंकेविरुद्ध २७४.४१च्या स्ट्राईक रेटने ४३ चेंडूत ११८ धावा केल्या होत्या. शिवमच्या कामगिरीमुळे या यादीत ते अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आले.
टी२० आंतरराष्ट्रीय डावातील (५०+ धावा) भारतीयांसाठी सर्वोच्च स्ट्राइक रेट:
३६२.५० – युवराज सिंग (१६ चेंडूत ५८ धावा) विरुद्ध इंग्लंड, डर्बन २००७
३४०.०० – अभिषेक शर्मा (२० चेंडूत ६८* धावा) विरुद्ध न्यूझीलंड, गुवाहाटी २०२६
२८२.६० – शिवम दुबे (२३ चेंडूत ६५ धावा) विरुद्ध न्यूझीलंड, विशाखापट्टणम २०२६
२७७.२७ – सूर्यकुमार यादव (२२ चेंडूत ६१ धावा) विरुद्ध दक्षिण आफ्रिका
२७४.४१ – रोहित शर्मा (४३ चेंडूत ११८ धावा) विरुद्ध श्रीलंका






