शनिवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाचव्या व अंतिम टी20 सामन्यात ईशान किशनने अक्षरशः मैदान गाजवले. तिरुवनंतपुरमच्या मैदानावर खेळताना ईशानने अवघ्या 43 चेंडूंमध्ये 103 धावांची तुफानी खेळी साकारली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि तब्बल 10 षटकार लगावले. विशेष म्हणजे, हे ईशान किशनचे टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच शतक ठरले. त्याने 42 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत भारतीय क्रिकेटमध्ये एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
या सामन्यात संजू सॅमसन तिसऱ्या षटकात अवघ्या 6 धावांवर बाद झाल्यानंतर ईशान किशन फलंदाजीसाठी उतरला. मैदानात येताच त्याचा आक्रमक अंदाज दिसून आला. सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव टाकत त्याने 28 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पुढील 50 धावा त्याने केवळ 14 चेंडूंमध्ये झळकावल्या. 17व्या षटकात सलग दोन चेंडूंवर षटकार मारत त्याने शतक पूर्ण केले. डीप मिडविकेटच्या दिशेने खेचलेला त्याचा फटका पाहून संपूर्ण स्टेडियम जल्लोषाने दुमदुमून गेले. अखेर 18व्या षटकात जेकब डफीने त्याला बाद केले.
ईशान किशनने कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी 137 धावांची दमदार भागीदारी केली. सूर्यकुमार यादवने 30 चेंडूंमध्ये 63 धावांची खेळी केली. तसेच हार्दिक पांड्याच्या (17 चेंडूंमध्ये 42 धावा) साथीने चौथ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी उभारली. या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 5 गडी गमावून तब्बल 271 धावांचा विशाल स्कोर उभारला.
टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान शतक
35 चेंडू – रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका (इंदौर, 2017)
37 चेंडू – अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड (मुंबई, 2025)
40 चेंडू – संजू सॅमसन विरुद्ध बांगलादेश (हैदराबाद, 2024)
41 चेंडू – तिलक वर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (जोहान्सबर्ग, 2024)
42 चेंडू – ईशान किशन विरुद्ध न्यूझीलंड (तिरुवनंतपुरम, 2026)*
45 चेंडू – सूर्यकुमार यादव विरुद्ध श्रीलंका (राजकोट, 2023)
या शतकासह ईशान किशन भारताकडून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. याआधी सूर्यकुमार यादवने 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 45 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. ईशानने हा विक्रम मोडीत काढत स्वतःचे नाव इतिहासात नोंदवले. तसेच, टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी ईशान किशनची ही खेळी भारतीय संघासाठी निश्चितच आशादायी ठरली आहे.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे भारतीय फलंदाज
9 – विराट कोहली
8 – रोहित शर्मा
8 – अभिषेक शर्मा
7 – के. एल. राहुल
7 – ईशान किशन*
6 – ऋतुराज गायकवाड
6 – सूर्यकुमार यादव
6 – संजू सॅमसन
6 – शुभमन गिल






