सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 209 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय फलंदाजांनी अवघ्या 15.2 षटकांत तीन विकेट गमावत हे लक्ष्य सहज पार करत सर्वांनाच चकित केलं.
भारताची फलंदाजी इतकी आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण होती की, रायपूरमध्ये टीम इंडिया 250 धावांचंही लक्ष्य पार करू शकली असती, असं चित्र सामन्यादरम्यान पाहायला मिळालं. या दणदणीत पराभवानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने सामन्यानंतर दिलेलं विधान विशेष चर्चेत आलं. “या भारतीय संघाविरुद्ध विजयासाठी किती धावा पुरेशा ठरतील?” असा प्रश्न विचारला असता, सँटनर हसत म्हणाला, “बहुधा 300 धावा तरी हव्यात!”
सँटनरने पुढे स्पष्ट केलं की, “भारतासारख्या संघाविरुद्ध खेळताना प्रत्येक चेंडूपासूनच दबावाखाली असतो. उत्तम विकेट आणि जलद आऊटफिल्डवर भारतीय फलंदाज पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळतात. प्रत्येक फलंदाजाला मुक्तपणे खेळण्याची मुभा आहे. आमच्यासाठी दबाव निर्माण करणं गरजेचं होतं, पण आता 200 किंवा 210 धावा पुरेशा नाहीत, हे मान्य करावंच लागेल.”
न्यूझीलंडच्या संघरचनेबाबत बोलताना सँटनर म्हणाला की, आगामी सामन्यांत काही बदल होऊ शकतात. “वर्ल्ड कपच्या दृष्टीने प्रत्येक खेळाडूला संधी देणं आणि योग्य संयोजन शोधणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आज आम्ही काही प्रमाणात रोटेशन केलं, पण दबावात खेळण्याचा अनुभवही आमच्यासाठी शिकवण देणारा ठरला,” असं तो म्हणाला.
स्वतःच्या फलंदाजीबाबत सँटनरने सांगितलं की, सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना धावा करणं त्याची जबाबदारी आहे. तसेच सामन्यात दवाचाही परिणाम जाणवला. “स्पिनर म्हणून दवामुळे चेंडू पकडणं कठीण जातं, पण इथलं हवामान तुलनेनं थंड असल्याने आम्ही परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू,” असंही त्याने नमूद केलं.






