---Advertisement---

IND vs NZ: ईशान किशन किंवा संजू सॅमसन नव्हे, ‘हा’ धडाकेबाज खेळाडू बनू शकतो रिषभ पंतचा रिप्लेसमेंट

On: रविवार, जानेवारी 11, 2026 9:12 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. सराव सत्रादरम्यान पंतच्या कंबरेच्या वरच्या भागात, बरगड्यांजवळ चेंडू लागल्याचे सांगितले जात आहे. चेंडू लागल्यानंतर पंत वेदनेने कळवळताना दिसून आला. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह सपोर्ट स्टाफ तत्काळ मैदानावर दाखल झाला आणि काही वेळातच पंतला मैदानाबाहेर नेण्यात आले.

बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसली, तरी सूत्रांच्या माहितीनुसार पंतची दुखापत गंभीर असून तो न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकणार नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापनासमोर आता पंतच्या रिप्लेसमेंटचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या केएल राहुल हा भारतीय वनडे संघाचा नियमित विकेटकीपर आहे, तर रिषभ पंतला बॅक-अप म्हणून संघात स्थान देण्यात आले होते.

पंतने 2024 मध्ये अखेरचा वनडे सामना खेळला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी तो संघात होता, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता तो जर अधिकृतपणे मालिकेतून बाहेर झाला, तर ईशान किशन किंवा संजू सॅमसन नव्हे, तर ध्रुव जुरेल हा त्याचा प्रमुख रिप्लेसमेंट ठरू शकतो, असे संकेत मिळत आहेत.

ईशान किशन आणि संजू सॅमसन हे दोघेही आगामी टी20 वर्ल्ड कप 2026 च्या योजनांचा भाग आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापन या दोघांना वनडे मालिकेसाठी वापरून कोणताही धोका पत्करण्याच्या मनःस्थितीत नाही. अशा परिस्थितीत ध्रुव जुरेल हा सुरक्षित आणि योग्य पर्याय मानला जात आहे. जुरेलने आतापर्यंत भारतासाठी कसोटी आणि टी20 पदार्पण केले असले, तरी वनडेत अजून संधी मिळालेली नाही.

लिस्ट-ए क्रिकेटमधील जुरेलचा रेकॉर्ड अत्यंत प्रभावी आहे. त्याने 17 सामन्यांत 74.70 च्या सरासरीने 747 धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचा समावेश असून त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 160 अशी आहे. सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्येही जुरेल जबरदस्त फॉर्ममध्ये असून 558 धावांसह तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्याच्या परिस्थितीत रिषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेल हा सर्वात सक्षम पर्याय मानला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---