---Advertisement---

‘प्रश्नच नाही, संजूला काढा आणि इशानला घ्या’! दिग्गज विकेटकीपरचा टीम इंडियाला सल्ला

On: गुरूवार, जानेवारी 29, 2026 4:11 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. यामध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत त्यांचा फॉर्म उत्तम असल्याचे दाखवले आहे. तसेच यामधील काही खेळाडूंची टी२० विश्वचषक २०२६च्या भारतीय संघात निवड झाली आहे. एक खेळाडू मात्र मालिका संपत आली असतानाही खराब कामगिरी करत आहे. त्याला संघातून काढा आणि इशान किशनला घ्या, असे भारताच्या माजी क्रिकेटपटूने म्हटले आहे.

टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याने दोन्ही संघांसाठी सरावाची ही शेवटची संधी आहे. त्यातच भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन मात्र लागोपाठ चार सामन्यांत धावा करण्यात अपयशी ठरला. दुसरीकडे इशान किशन चांगली कामगिरी करत आहे. या दोघांचाही भारताच्या टी२० विश्वचषक संघात सहभाग आहे, मात्र संघ व्यवस्थापकांनी आणि निवडकर्त्यांनी संजूला प्रमुख विकेटकीपर-फलंदाज म्हणून संघात घेतले आहे. तर त्याच्यासाठी पर्यायी खेळाडू म्हणून इशानची निवड करण्यात आली.

“विश्वचषक जवळ आल्याने दोघांपैकी इशानला संधी द्या”, असे विधान भारताचा माजी विकेटकीपर-फलंदाज पार्थिव पटेलने केले आहे.

“मी जर भारताच्या विचारसत्राचा भाग असतो तर शेवटच्या सामन्यात इशानला संधी दिली असती,” असे पटेलने जिओहॉटस्टारवर म्हटले आहे.

“मी संजूला बाकावर बसवले असते आणि इशानला विकेटकीपर-फलंदाज म्हणून संघात घेतले असते. टी२० विश्वचषकात मला इशान विकेटकीपर-फलंदाज म्हणून घ्यायचा असेल तर मी त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात संधी देईल,” असेही पटेलने पुढे म्हटले आहे.

तिलक वर्मा दुखापतीतून सावरत असल्याने संघासाठी जमेची बाजू आहे. त्याबाबतही पटेल म्हणाला, “तिलक टी२० विश्वचषकाआधी पूर्णपणे फिट होऊन संघात परतणार असून आता कशाची वाट बघताय? शेवटच्या सामन्यात संजूच्या जागी इशानला खेळवा.”

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तिलकच्या जागी श्रेयस अय्यरला घेतले होते, मात्र त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच इशान या मालिकेतील तीन सामन्यात खेळला. त्याने दुसऱ्या सामन्यात तर सामनाविजयी (३२ चेंडूत ७६ धावा) खेळी केली होती. संजूने ४ सामन्यात १०, ६, ० आणि २४ अशा धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---