आजपासून (बुधवार २१ जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी२० मालिका सुरू होत आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला जाणार आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२६ची पूर्वतयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जाते. यामध्ये भारताचे नेतृत्व पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव करणार आहे. तो भारताचा टी२० कर्णधार म्हणून यशस्वी ठरला आहे, मात्र फलंदाज म्हणून त्याचा फॉर्म निराशाजनक आहे. याबाबत विचारताच त्याने गोंधळात टाकणारे उत्तर दिले.
सूर्यकुमारने भारताच्या टी२० कर्णधारपदाची धुरा हातात घेताच संघाच्या विजयाकडे अधिक लक्ष दिले. यामुळे त्याच्या फलंदाजीवर परिणाम झाला. याचा प्रत्यय मागील काही टी२० मालिकांमधून आला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेआधी भारतीय कर्णधाराने पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्याला त्याच्या फॉर्मविषयी विचारले गेले. तेव्हा त्याने दिलेले उत्तर विचित्रच होते.
सूर्यकुमार त्याच्या फॉर्मबाबत म्हणाला, “मी काही टेनिस किंवा कोणता वैयक्तिक खेळ खेळत नाही. हा सांघिक खेळ आहे आणि यामध्ये संपूर्ण संघाचा विचार केला जातो. जर संघ जिंकत असेल तर अर्थातच मलाही आनंद होईल. संघाच्या विजयात माझे योगदान किती याचा मी विचार नाही तर बाकी १४ खेळाडूंचा विचार करतो. तसेच वैयक्तिक कामगिरी आणि विक्रमे यांकडेही लक्ष देत नाही.”
सूर्यकुमारने मागील १९ सामन्यांपासून एकही अर्धशतकी खेळी केलेली नाही. यामध्ये त्याने केवळ २१८ धावा केल्या आहेत. त्यालाही माहित आहे त्याच्या खराब कामगिरीचा संघावर परिणाम होईल, यासाठी त्याला फलंदाजीच्या लयीत लवकरच परतावे लागणार आहे. मागील काही मालिकांमध्ये पाहिले तर सूर्यकुमार तिलक वर्माला अधिक संधी मिळावी यासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत असे.
तसेच संघातील इशान किशन न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. श्रेयस अय्यरही संघात असून तो खूप कालावधीनंतर भारताच्या टी२० संघात परतला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारताचा संघ-
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंह, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई. हर्षित राणा.





