भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील तिसरा टी२० सामना रविवारी (२५ जानेवारी) गुवाहाटी येथे खेळला गेला. हा सामना भारताने ८ विकेट्सने जिंकत मालिकाही खिशात टाकली आहे. या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा मोठा विक्रम मागे टाकला आहे.
पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत भारताने विजयाची हॅट्ट्रीक पूर्ण केली. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केल्याने न्यूझीलंड २० षटकात ९ विकेट्स गमावत १५३ धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. भारताने हे लक्ष्य अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमारच्या नाबाद अर्धशतकी खेळीने केवळ १० षटकातच पूर्ण केले.
बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सूर्यकुमारने कर्णधार पदाला साजेशी खेळी केली. त्याने २६ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. तर अभिषेकने २० चेंडूत ६८ धावा केल्या. या सामन्याचा सामनावीर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ठरला. त्याने ४ षटकात १७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताचा हा ३३वा टी२० विजय ठरला. त्याने भारताचे नेतृत्व करताना सर्वाधिक टी२० सामने जिंकण्याच्या यादीत विराटला मागे टाकले आहे. विराटच्या नेतृत्वात भारत ३२ सामने जिंकला होता. विषेश म्हणजे सूर्यकुमारने ४१ सामन्यातच ही कामगिरी केली असून विराटने ५० टी२० सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते.
या यादीत एमएस धोनी आणि रोहित शर्मा सूर्यकुमारच्या पुढे आहेत. धोनीने टी२०मध्ये भारताचे नेतृत्व करताना ४२ सामन्यात विजय मिळवला, तर रोहितच्या नेतृत्वात भारत ५० टी२० सामने जिंकला आहे.
त्याचबरोबर सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत एकही टी२० मालिका गमावलेली नाही. त्याने १० टी२० मालिकांमध्ये भारताचे कर्णधारपद सांभाळले. त्यातील ९ मालिका भारताने जिंकल्या, तर एका मालिकेचा निकाल बरोबरीत राहिला.
या मालिकेतील चौथा सामना २८ जानेवारीला विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे.






