वनडे मालिकेनंतर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 थराराला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार असून, यातील पहिला सामना 21 जानेवारी रोजी होणार आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या हातात असणार आहे. पहिल्या टी20 सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात भारताची सलामी जोडी म्हणून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. मागील मालिकेत शुबमन गिलसोबत अभिषेकने डावाची सुरुवात केली होती, मात्र अपेक्षित कामगिरी न झाल्याने गिलला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत संजू सॅमसन हा सर्वात मजबूत पर्याय मानला जात आहे. संजूने याआधीही सलामी करताना प्रभावी कामगिरी केली आहे.
तिसऱ्या क्रमांकावर स्वतः कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीला येऊ शकतो. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना त्याने याआधी सातत्याने धावा केल्या आहेत. सध्या त्याचा फॉर्म काहीसा चिंतेचा विषय असला, तरी हा क्रमांक त्याला पुन्हा लय मिळवून देऊ शकतो. जर सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर आला नाही, तर ईशान किशनला संधी मिळू शकते. तिलक वर्मा दुखापतीमुळे पहिल्या तीन टी20 सामन्यांना मुकणार असल्याने ईशानसाठी ही चांगली संधी ठरू शकते.
मधल्या फळीत हार्दिक पांड्याचा समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे. सध्या तो एकाच फॉरमॅटमध्ये खेळत असून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्यासोबत अक्षर पटेल किंवा रिंकू सिंग यांपैकी एक खेळू शकतो. दोघांचीही टीममध्ये उपस्थिती महत्त्वाची आहे. शिवम दुबे आणि हर्षित राणा यांच्यात एकासाठी स्पर्धा असण्याची शक्यता आहे. हर्षित राणाने शेवटच्या वनडेत केलेली फलंदाजी त्याच्या बाजूने जाऊ शकते.
वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांची जोडी जवळपास निश्चित आहे. फिरकीची जबाबदारी वरुण चक्रवर्ती सांभाळू शकतो. अशा परिस्थितीत कुलदीप यादवला पहिल्या सामन्यात बाहेर बसावे लागू शकते. उपकर्णधार अक्षर पटेलचा संघात समावेशही जवळपास ठरलेलाच आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), ईशान किशन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.






