भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंड संघ अवघ्या ६२ धावांवर सर्वबाद झाला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने न्यूझीलंड संघाचे सुरुवातीचे तीन महत्वाचे विकेट्स घेतले. त्यामुळे संघ खूपच स्वस्तात तंबूत परतला. सिराजने न्यूझीलंडचा दिग्गज रॉस टेलरची देखील विकेट घेतली. टेलरची विकेट घेण्यासाठी सिराजने जो चेंडू टाकला, त्याचे अनेकांनी कौतुक केले. आता सिराज देखील त्याने टाकलेल्या या चेंडूविषयी व्यक्त झाला आहे.
दुसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघाला फलंदाजीची संधी मिळाली आणि संघ स्वस्तात बाद देखील झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर टेलरला टाकलेल्या चेंडूविषयी सिराजने मोठी प्रतिक्रिया दिली. सिराजने टाकलेल्या त्या चेंडूवर टेलर क्लिन बोल्ड झाला होता. त्याच्या मते त्याने टाकलेला हा चेंडू प्रत्येक गोलंदाजासाठी एक स्वप्न आहे. तो याबाबत बोलताना म्हणाला की, “योजना इनस्विंग चेंडूसाठी क्षेत्ररक्षण लावण्याची होती. लक्ष्य होते की, चेंडू पॅडवर मारावा, पण ज्याप्रकारे मी लयात येत होतो, तर मी विचार केला की, ओउटस्विंग चेंडू का नको टाकायला ? हा निर्णय योग्य ठरला. हा कोणत्याही गोलंदाजाच्या स्वप्नातील चेंडू होता.”
https://twitter.com/VedPathak35/status/1467140132692119552?t=QFyq2PJ2nNUnOfoeIsjrPA&s=19
न्यूझीलंडविरुद्ध जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात मोहम्मद सिराजलाच्या हाताच्या बोटांमध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर तो संघाच्या बाहेर होता. कानपूरमधील पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मदच्या जागी ईशांत शर्माला संधी दिली गेली होती. त्यानंतर आता मुंबई खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सिराजने संघात पुनरागमन केले आणि चांगले प्रदर्शन देखील केले.
तो पुढे बोलताना म्हणाला की, “जेव्हा मी दुखापतीतून ठीक झाल्यानंतर सराव सुरू केला. तेव्हा मी जास्तीत जास्त स्विंग मिळवण्यासाठी एका विकेटला लक्ष्य केले आणि खूप गोलंदाजी केली. माझे लक्ष्य त्याच्यावरच होते.”
मोहम्मद सिराजने न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला बाद करण्यासाठी १४७ पेक्षा जास्त वेगाने एक बाउंसर चेंडू टाकला होता. तो याबाबत बोलताना म्हणाला की, “जेव्हा मला कसोटी सामन्यात संधी मिळते तेव्हा मला एकाच क्षेत्रात सतत गोलंदाजी करायला आवडते. त्यामुळेच मला विकेट घेण्यासाठी मदत मिळते.”
दरम्यान, या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाज खूपच आक्रमक भूमिकेत दिसले. वेगवान गोलंदाज सिराजने पहिल्या डावात एकूण तीन विकेट्स घेतल्या. अष्टपैलू रवींद्र जडेजाने न्यूझीलंडच्या सर्वाधिक चार खेळाडूंना तंबूत पाठवले. तर अक्षर पटेल २ आणि जयंत यादवने एक विकेट घेतली. पहिल्या डावात न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने भारताच्या १० विकेट्स घेतल्या आणि इतिहास रचला.