भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरू आहे. हा सामना १९ वर्षाखालील मुलांच्या वनडे विश्वचषकातील सुपर-६चा सामना आहे. बुलवायोमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर वैभव सुर्यवंशी आणि ऍरॉन जॉर्ज फलंदाजीसाठी आले. या सामन्यातून पुन्हा एकदा पाकिस्तानचा क्षेत्ररक्षणातील गोंधळ दिसून आला.
यामध्ये पाकिस्तानने वैभवचा झेल सोडलाच त्याचबरोबर त्याचवेळी धावबाद करण्याची संधीही सोडली. त्यांच्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वैभवला बाद करण्याची संधी गमावणे पाकिस्तानला महागात पडले असते, मात्र त्यांनी वेळीच पुनरागमन केले. वैभव २२ चेंडूत ३० धावा करत बाद झाला आणि पाकिस्तानच्या जीवात जीव आला.
या सामन्यात पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण वाईट झाले असले तरी त्यांची गोलंदाजी मात्र उत्तम दिसत आहे. भारताने पहिल्या तीन विकेट्स ४७ धावसंख्येवरच गमावल्या. भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे तर दोन चेंडूत भोपळा न फोडताच तंबूत परतला. त्यानंतर विहान मल्होत्रा आणि वेदांत त्रिवेदी यांनी संघाचा डाव सावरला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी ९३ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. विहान २१ धावा करत बाद झाला.
दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. सुपर-६मध्ये भारताने ३ पैकी ३ सामने जिंकले आहेत. त्यामुळे ते दुसऱ्या स्थानावर आहेत. या यादीत पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर असून त्यांनी ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. हा सामना जिंकत दोघांची उपांत्य फेरीत जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे सामन्याचा काय निर्णय लागतो याकडे लक्ष असणार आहे.
सोशल मीडियावर मात्र पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. तसेच या दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये नाणेफेकीवेळीही तणाव दिसला. दोघांनीही नाणेफेक झाल्यानंतर हस्तांदोलन केले नाही. भारत-पाकिस्तान यांच्यात पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर राजकीय, सामाजिक तसेच क्रीडा क्षेेत्रात संबंध आणखी बिघडले आहेत.






