आशिया चषक स्पर्धेत भारताने पहिले दोन्ही सामने जिंकले आणि सुपर फोरमध्ये जागा पक्की केली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पाकिस्तान आणि हाँगकाँग यांना या सामन्यांमध्ये पराभवाची धूळ चारली. आता भारताला सुपर फोरमधील पहिल्या सामन्यात पुन्हा एकदा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत खेळायचे आहे. या महत्वाच्या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमद्ये काही महत्वाचे बदल होऊ शकतात. संघात दोन असे गोलंदाज आहेत, ज्यांना आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी खेळण्याची संधी दिली जाणे गरजेचे आहे.
भारत आणि पाकिस्तान संघ आशिया चषक 2022 मध्ये येत्या रविवारी म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा आमने सामने असतील. उभय संघातील पहिला सामना भारताने 5 विकेट्सच्या अंतराने जिंकला होता. या सामन्यात हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा या जोडीने चमकदार कामगिरी केली होती. तसचे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानच्या 4 खेळाडूंनी शरणागती पत्करली होती. असे असले तरी, संघ व्यपस्थापन पुढच्या सामन्यासाठी संघात काही महत्वाचे बदल करू शकते.
पाकिस्तान आणि हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल खेळला, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. यादरम्यान चहलने 50 धावा खर्च केल्यामुळे संघासाठी तो महागात पडल्याचेच दिसते. अशात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) या दोघांच्या रूपात चांगले पर्यायी खेळाडू आहेत.
रवी बिश्नोई –
रवी बिश्नोईने भारतासाठी खेळलेल्या 9 टी-20 सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसरीकडे चहलने मात्र 2022 सुरू झाल्यापासून खेळलेल्या 14 सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. अशात रोहित शर्मा सुपर फोरमध्ये रवी बिश्नोईला संधी देऊ शकतो. आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी बिश्नोई फॉर्ममध्ये राहिला, तर संघासाठी ही चांगली बाब असेल. चहल आणि बिश्नोई दोघेही लेग स्पिनर आहेत, ज्यामुळे दोघांना एकत्र खेळवणे अवघड आहे.
रविचंद्रन अश्विन –
आशिया चषक यूएईत खेळवला जात असून फिरकी गोलंदाजांना फायदा मिळत आहे, असे दिसत आहे. भारतीय संघही सुपर फोरमध्ये अतिरिक्त फिरकी गोलंदाजासह उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. रविचंद्रन अश्विनला यावेळी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाण्याची पूर्ण शक्यता आहे. कारण म्हणजे वेगवान गोलंदाज आवेश खान. आवेशने आयपीएलमध्ये ज्या पद्धतीचे प्रदर्शन केले, ते पाहता सध्या तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. त्याने मागच्या दोन सामन्यांमध्ये 6 षटके गोलंदाजी केली, ज्यामध्ये 72 धावा खर्च केल्या आणि दोन विकेट घेऊ शकला. अश्विन भारतासाठी विरोधी संघाच्या धावांवर लगाम लावू शकतो.
दरम्यान, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे आशिया चषकात खेळत नाहीये. बुमराहच्या अनुपस्थितीतच भुवनेश्वर कुमारवर गोलंदाजी आक्रमणाची मदार सोपवली गेली आहे, ज्याला अर्शदीप सिंगची चांगली साथ मिळाली. अष्टपैलू रविंद्र जडेजा चांगल्या फॉर्ममध्ये होता पण दुखापतीमुळे त्यानेही आशिया चषकातून माघार घेतली. अक्षर पटेल याला जडेजाच्या बदली खेळाडूच्या रूपात संघात घेतले गेले आहे. सुपर फोरमध्ये भारताला पाकिस्तानव्यतिरिक्त 6 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि 8 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान यांच्याशी खेळायचे आहे. अशिया चषकातील अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानलाही जे जमलं नाही, ते झिम्बाब्वेने तीनच सामन्यात करून दाखवलं; ऑस्ट्रेलियाला मायदेशात हरवलं
VIDEO | दम वाढवण्यासाठी विराटची ट्रीक, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी खास मास्क घालून केला सराव
फखरचा कहर! पूर्ण ताकदनिशी मारला शॉट आणि चेंडू थेट स्टेडियमबाहेर, पाहा सिक्स